विमानतळावर केसात गजरा माळल्याने अभिनेत्रीला 1.25 लाख दंड

 विमानतळावर केसात गजरा माळल्याने अभिनेत्रीला 1.25 लाख दंड

मेलबर्न, दि. ८ : मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नव्या नायर यांना ऑस्ट्रेलियातील मेलबर्न आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक अनपेक्षित अडचण आली. ओणम उत्सवात सहभागी होण्यासाठी मेलबर्नला जात असताना, त्यांनी केसात माळलेला चमेलीचा गजरा त्यांच्या प्रवासात अडथळा ठरला. ऑस्ट्रेलियाच्या कठोर जैवसुरक्षा कायद्यांनुसार, देशात कोणत्याही प्रकारची फुलं, फळं, बियाणं किंवा वनस्पती आणणं गुन्हा मानला जातो. त्यामुळे नव्या नायर यांना 1980 ऑस्ट्रेलियन डॉलर्स, म्हणजेच सुमारे ₹1.14 लाखांचा दंड ठोठावण्यात आला.

नव्या नायर यांना त्यांच्या वडिलांनी कोचीहून प्रवासासाठी चमेलीच्या फुलांचा गजरा दिला होता. त्यांनी तो दोन भागांमध्ये विभागला — एक प्रवासात केसात माळण्यासाठी आणि दुसरा हँडबॅगमध्ये ठेवण्यासाठी. मात्र, मेलबर्न विमानतळावर पोहोचल्यावर सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांच्या हँडबॅगमध्ये ठेवलेला १५ सें.मी. लांबीचा गजरा आढळून काढला आणि त्यावर दंड आकारला.

नव्या नायर यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात सांगितले की, “ही चूक माझ्याकडून नकळत झाली. कायद्याबद्दल अज्ञान हे निमित्त ठरू शकत नाही. छोट्या गजऱ्यामुळे एवढा मोठा दंड लागला, पण नियम म्हणजे नियमच.” त्यांनी हेही स्पष्ट केलं की, या प्रसंगामुळे त्यांच्या ओणम साजरी करण्याच्या आनंदावर परिणाम झाला नाही. मेलबर्नमध्ये मल्याळी समुदायासोबत त्यांनी उत्सव आनंदाने साजरा केला.

ऑस्ट्रेलिया हा जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील देश आहे. तिथे बाहेरील देशांतून आलेल्या वस्तूंनी परिसंस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच विमानतळांवर कडक तपासणी केली जाते आणि प्रवाशांनी प्रत्येक वस्तू घोषित करणं बंधनकारक असतं. नियम मोडल्यास जड दंड आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते.

ही घटना परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीयांसाठी एक महत्त्वाचा धडा आहे — आपल्या परंपरा आणि सवयी जरी भावनिक असल्या, तरी दुसऱ्या देशात त्यांचे कायदेशीर परिणाम होऊ शकतात. नव्या नायरच्या अनुभवाने अनेक प्रवाशांना जागरूकता मिळेल

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *