नाविन्यपूर्ण शिक्षण हेच राष्ट्राच्या प्रगतीचे साधन

पुणे, दि ६- एकविसाव्या शतकात शिक्षणाची परिभाषा पूर्णपणे बदलली आहे. शिक्षण आता केवळ विद्यापीठे, प्रयोगशाळा, पदवी घेण्यापर्यंत मर्यादित राहिले नसून ते राष्ट्राच्या प्रगतीचे एक साधन बनले आहे. त्यामुळे, विकसित भारत@२०४७ चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीसह इतर क्षेत्रात राष्ट्रासमोर असणाऱ्या समस्या सोडविण्यासाठीचे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायला हवे. धाडसी विचारांनीच भारत देश घडला असून, विद्यार्थ्यांनीही सर्वोत्तम देत आपल्या क्षेत्रात असणाऱ्या समस्यांना सोडविण्याचे धाडस दाखवावे, असे मत भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे (डीएसटी) सचिव प्रा. डाॅ.अभय करंदीकर यांनी व्यक्त केले.
ते येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या १०व्या विद्यारंभ-२५ कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी, व्यासपीठावर, माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डाॅ.विश्वनाथ दा. कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, कार्यकारी संचालक डाॅ.विनायक घैसास, प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे यांच्यासह विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक उपस्थित होते.
डाॅ.करंदीकर पुढे म्हणाले, डाॅ.अब्दुल कलाम यांनी म्हटल्याप्रमाणे, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत. कारण, त्यातून येणारे अपयश देखील ऐतिहासिक असते. तसेच, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या १५०+ एकरांच्या सुसज्ज अशा या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांसाठी क्रेया, रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर यांसारखे अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जातात, व त्यातून सध्या ७५+ संशोधन प्रकल्प चालू असल्याचे पाहून आनंद झाला.
विश्वशांती प्रार्थनेने सुरु झालेल्या या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.राजेश एस., यांनी तर आभार डाॅ.दुबे यांनी मानले. तर सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा वाघटकर व डाॅ.अशोक घुगे यांनी केले.
संपूर्ण विश्वाचे लक्ष भारताकडेः प्रा.डाॅ.विश्वनाथ कराड*
अध्यक्षीय भाषणात प्रा.डाॅ. विश्वनाथ कराड यांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. ते म्हणाले, विद्यार्थी दशेत गुरे चारत असतानाच शहरात जावून मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी नक्कीच मोठी स्पप्ने पाहावीत, कारण ती एक दिवस नक्कीच पूर्ण होतात. अमेरिका भेटीत मला समजले की, संपूर्ण विश्वाचे लक्ष सध्या भारताकडे आहे. कारण, सध्या अशांतता, युद्धाचे सावट, उठाव यांच्यात गुरफटलेल्या विश्वाला सुख, शांती आणि समाधानाचा राजमार्ग दाखविण्याचे सामर्थ्य भारतीय संस्कृतीत आहे, असेही त्यांनी पुढे म्हटले.KK/ML/MS