पंतप्रधानांच्या हस्ते उद्या होणार नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन

 पंतप्रधानांच्या हस्ते उद्या होणार नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन

मुंबई,दि. ७ : बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (NMIA) अखेर उद्या (दि. ८) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. हा भव्य कार्यक्रम उद्या दुपारी सुमारे २.४० दरम्यान पार पडणार आहे. पंतप्रधानांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी व्यापक वाहतूक निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत लागू राहतील. सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी संपूर्ण शहरात पोलिसांचा जोरदार बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

वाहतूकीत बदल
वाहतूक विभागाच्या उपायुक्तांनी जारी केलेल्या आदेशानुसार, सर्व प्रकारच्या मोठ्या मालवाहतूक वाहनांना ८ ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत प्रवेश, प्रवास किंवा पार्किंग करण्यास पूर्णपणे बंदी असेल. मुंबईकडून येणाऱ्या वाहनांना अटल सेतूपासून पुढे प्रवेश दिला जाणार नाही. वाशी आणि ऐरोली टोल नाक्यांवर मालवाहतूक वाहनांना थांबवण्यात येईल.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि पंतप्रधानांच्या ताफ्याच्या सुरक्षेसाठी विशेष मार्ग आणि डायवर्जन योजना आखण्यात आल्या आहेत.

या निर्बंधांमुळे अत्यावश्यक सेवा मात्र बाधित होणार नाहीत. रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलिस वाहने, सरकारी व सार्वजनिक वाहने आणि अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने यांना निर्बंधांपासून सूट देण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी ही वाहतूक व्यवस्था जाणून आपल्या प्रवासाचे आगाऊ नियोजन करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.

बंदोबस्त
मुख्य रस्त्यांवर आणि विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस फौज तैनात केली जाणार आहे. अधिकाऱ्यांना वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेवर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उद्घाटन समारंभासाठी येणाऱ्या खासगी बसेस व पाहुण्यांसाठी विशेष पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

SL/ML/SL

7 Oct. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *