परदेशी ऑनलाईन गेमींग विरोधात ईडीकडून देशभर कारवाई
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या देशभर ऑनलाईन गेमींगचे पेव फुटले आहे. अनेक कलाकार देखील या ऑनलाईन गेमींगचे प्रमोशन करताना दिसतात. त्यामुळे देशातील तरुणाई मोठ्या प्रमाणात या गेमींगच्या मागे लागली आहे. याद्वारे अनेक आर्थिक गैरप्रकारही होत आहेत. याची गंभीर दखल घेत ईडीने परदेशातील नोंदणीकृत ऑनलाइन गेमिंग वेबसाइट विरोधात अनेक राज्यांत छापे टाकले. २२ व २३ मे दरम्यान महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्रातील २५ ठिकाणी परदेशी चलन कायदा उल्लंघन प्रकरणात कारवाई करण्यात आली.
ऑनलाईन गेमिंग प्रकरणात सुमारे ४ हजार कोटी रुपये बेकायदा परदेशात पाठवल्याची माहिती ईडीच्या हाती लागली. त्याआधारे ५५ बँक खाती गोठवण्यात आली. १९.५५ लाख रुपये व २२,६०० डॉलरपेक्षा जास्त रोकड जप्त करण्यात आली.
ऑनलाइन गेमिंग कंपन्या आणि संकेतस्थळांची कुराकाओ, माल्टा, सायप्रससारख्या लहान देशांत नोंदणी केली जाते. या कंपन्या बोगस नावाने असलेल्या भारतीय बँक खात्यांशी जोडलेल्या आहेत. त्यांचा ऑनलाइन गेमिंगशी काहीही संबंध नाही, असे समोर आले आहे. गेमिंग वेबसाइटच्या माध्यमातून सामान्य लोकांकडून गोळा केलेले पैसे अनेक बँक खात्यांतून परदेशात पाठवले जातात. वस्तू व सेवांच्या आडून ४ हजार कोटी पाठवण्यासाठी प्रमुख व्यक्तींनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या नावे शेकडो कंपन्या सुरू केल्याचे उघड झाले आहे.
SL/KA/SL
25 May 2023