भारताची पहिली राष्ट्रीय आदिवासी आरोग्य वेधशाळा
नवी दिल्ली, दि. 16 : भारत सरकारच्या आदिवासी व्यवहार मंत्रालयाने देशातील आदिवासी आरोग्य सुधारण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मंत्रालयाने भारताचे पहिले राष्ट्रीय आदिवासी आरोग्य वेधशाळा (National Tribal Health Observatory) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या वेधशाळेच्या स्थापनेसाठी ICMR, AIIMS (नवी दिल्ली व जोधपूर), आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, आयुष मंत्रालय आणि WHO यांसारख्या अग्रगण्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांची भागीदारी आहे. यामुळे जागतिक पुरावे, वैज्ञानिक अचूकता आणि सर्वोत्तम पद्धती आदिवासी आरोग्य व्यवस्थेत समाविष्ट होतील.
उद्दिष्टे
आदिवासी भागांमधील आरोग्य विषमता कमी करणे
असुरक्षित आदिवासी गट (PVTG) यांच्यासाठी विशेष आरोग्य धोरणे तयार करणे
स्थानिक ज्ञान प्रणाली आणि आधुनिक सार्वजनिक आरोग्य आराखडे यांचा समन्वय साधणे
रोग-विशिष्ट अंमलबजावणी संशोधनाला चालना देणे
ICMR-RMRC सोबतच्या सामंजस्य करारामुळे एक सुरक्षित डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित होणार आहे. यात डॅशबोर्ड, GIS-सक्षम विश्लेषण आणि नियतकालिक आदिवासी आरोग्य निष्कर्ष समाविष्ट असतील. भारत आदिवासी कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (BTFHS), राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (NTEP) आणि राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण केंद्र (NCVBDC) यांसारख्या राष्ट्रीय कार्यक्रमांशी संरेखित संशोधन शक्य होईल.
भारताचे पहिले राष्ट्रीय आदिवासी आरोग्य वेधशाळा हे शाश्वत आरोग्य परिणाम साध्य करण्यासाठीचे अभूतपूर्व पाऊल आहे. हे उपक्रम आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या वचनबद्धतेला अधोरेखित करतो आणि देशातील सर्वात वंचित आदिवासी भागांना आरोग्यदायी भविष्याकडे नेण्याचा मार्ग मोकळा करतो. ही वेधशाळा आदिवासी आरोग्य क्षेत्रातील धोरणनिर्मिती, संशोधन आणि अंमलबजावणीसाठी एक राष्ट्रीय नोडल केंद्र ठरणार आहे.
SL/ML/SL