विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी होणार ‘नॅशनल टास्क फोर्स’ ची स्थापना

नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परीक्षेचा ताण आणि भविष्यातील करिअरची चिंता यामुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या ही समस्या आता उग्र रूप धारण करत आहे. या प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टास्क फोर्स स्थापन करण्याचा आदेश दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, गुणांवर आधारित शिक्षण प्रणालीमध्ये कामगिरी करण्याचा दबाव आणि उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये मर्यादित जागांसाठी वाढती स्पर्धा यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर भयानक भार पडतो. विद्यार्थ्यांमधील मानसिक आरोग्य समस्या आणि आत्महत्येच्या घटना रोखण्यासाठी ‘नॅशनल टास्क फोर्स’ (एनटीएफ) स्थापन करण्याचे आदेश खंडपीठाने दिले. हा आदेश आयआयटी दिल्लीमध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्येशी संबंधित प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आला.
न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की – विद्यापीठांनी केवळ शिक्षण केंद्रे बनू नयेत, तर विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी जबाबदार असलेल्या संस्थेची भूमिका देखील बजावली पाहिजे.खंडपीठाने पुढे म्हटले की जर ते असे करण्यात अयशस्वी झाले तर शिक्षणाचा उद्देश म्हणजेच सशक्तीकरण, सक्षमीकरण आणि जीवन परिवर्तन करणे अपूर्ण राहील.
दिल्ली उच्च न्यायालयाने जानेवारी २०२४ मध्ये पोलिसांना एफआयआर नोंदवण्याची परवानगी नाकारली होती, ज्याविरुद्ध विद्यार्थ्यांच्या पालकांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. कुटुंबाच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवून प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले होते.
SL/ML/SL
25 March 2025