राष्ट्रीय अभियांत्रिकी दिवस: नवनवीन रचना आणि पुनर्रचना करणारा किमयागार

 राष्ट्रीय अभियांत्रिकी दिवस: नवनवीन रचना आणि पुनर्रचना करणारा किमयागार

-राधिका अघोर

भारतातील सर्वोत्कृष्ट अभियंत्यांपैकी एक मानले जाणारे, भारतीय अभियांत्रिकीचे जनक, सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती म्हणजेच आज 15 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. ब्रिटिश काळात 1861 साली जन्मलेल्या सर विश्वेश्वरय्या यांनी, पुण्याच्या सायन्स कॉलेज मधून अभियांत्रिकीची पदवी घेतली होती. त्यानंतर, त्यांनी 1912 साली, म्हैसूरच्या संस्थानाचे दिवाण म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. इथेच, त्यांनी एकाहून एक सरस अशा स्थापत्य प्रकल्पांची बांधणी केली. मांड्या इथे त्यांनी बांधलेले कृष्णराज सागर धरण, सिंचनासाठी वरदान ठरलं. त्यांनी उभारलेले प्रकल्प त्यांची दूरदृष्टी आणि समाजाप्रतीची कळकळ व्यक्त करणारे आहेत. देशभरात बांधलेल्या अनेक नद्यांची धरणं आणि पूल यशस्वी करण्यात विश्वेश्वरय्या यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्यामुळं देशातील पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला. त्यांच्याच कार्याचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. त्यांना सरकारने भारतरत्न ही सर्वोच्च पदवी देऊन गौरवलं आहे. केवळ विश्वेवरय्या यांचा नाही, तर देशातील सर्व अभियंत्यांचा गौरव करण्यासाठी, ह्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.

अभियांत्रिकी क्षेत्र कायमच विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र राहिले आहे आणि देश उभारणीत त्यांचे योगदानही महत्वाचे राहिले आहे. एकेकाळी अभियंता म्हणजे, सिव्हिल म्हणजे बांधकाम करणारी, घरं, इमारती, धरणं, पूल बांधणारी व्यक्ती म्हणजे अभियंता अशी आपली समज असे. तिसऱ्या औद्योगिक क्रांतीनंतर, संपूर्ण जगाची पुनर्रचना होण्यात अभियांत्रिकी शास्त्र आणि अभियंते यांचा मोठा वाटा आहे आणि आज जग जेव्हा चौथ्या औद्योगिक क्रांतीकडे वाटचाल करत आहे, अशा वेळीही अभियंत्यांची भूमिका तितकीच महत्वाची ठरते आहे. आजचे अभियंते एआय, क्लाऊड कम्प्यूटिंग, ब्लॉक चेन अशा नव्याच जगात स्वतःचे अस्तित्व सिद्ध करत आहेत.भारतीय अभियंत्यांचा आज जगभर बोलबाला आहे. काश्मीरच्या चिनाब नदीवर बांधलेला सर्वात उंच पूल असो, किंवा मग सेमीकंडक्टर सारख्या अत्याधुनिक प्रणाली असो, भारतीय अभियंते प्रत्येक आव्हानावर मात करत, आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत.

डॉक्टरकीचा व्यवसाय महत्वाचा असतोच; पण अनेकदा डॉक्टरांना जेवढा सन्मान मिळतो, किंवा त्यांच्या कार्याचे जे कौतुक होते, तेवढे कौतुक इंजिनियर्सचे होत नाही. त्यांची कामे ते शांतपणे करतात, ही कामे होतांना दिसत नाहीत, पण त्यांनी निर्माण केलेल्या अद्भुत वास्तू, एखादा पूल, जेव्हा समोर उभा राहतो, तेव्हा त्याचं महत्त्व, आणि ते घडवणारा किमयागार आपल्याला जाणवतो. अलीकडेच मुंबईत पूर्ण झालेला, अटल सागरी सेतू असो, किंवा मग किनारी मार्ग, यातील चमत्कार आपल्याला नंतर दिसतो. त्याशिवाय सॉफ्टवेअर हे तर एक अद्भुत जग आहे. जे दिसत नाही, पण त्याचे परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्याला अधिकाधिक समृद्ध करत राहतात. छोट्या छोट्या गोष्टी, जसे आपण करत असलेले डिजिटल पेमेंट किंवा एटीएम, एखादे अॅप, अशा सगळ्या गोष्टी या अभियंत्यांनीच विकसित केलेल्या असतात. पण त्या आपल्या अंगवळणी पडून जातात, दुधात साखर विरघळावावी तसं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्याचा एक भाग बनून, आयुष्य सुखकर करत राहतात. पण त्यांचं वेगळं अस्तित्व आपण समजून घेत नाही, किंवा ते आपल्याला जाणवत नाही. म्हणूनच आजचा दिवस अशा सगळ्या ज्ञात अज्ञात अभियंत्याचा, त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्याचा, त्यांचे आभार मानण्याचा दिवस आहे.

आताच्या काळातल्या जीवघेण्या स्पर्धेमुळे, इंजिनियरिंगला प्रवेश मिळवणे हेच एक मोठे आव्हान आहे. त्यातून पार करून, आपण जीव तोडून मेहनत केल्यानंतर योग्य प्लेसमेंट हे दुसरे आव्हान आहे. अनेक मुलं या जीवघेण्या स्पर्धेत थकतात, कधी मनासारखं झालं नाही, तर निराश होतात. मूळात अभियांत्रिकीच्या जागा कमी आहे, ह्या जगा वाढवायला हव्यात, जेणेकरून ही जीवघेणी स्पर्धा कमी होईल, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकेल, आणि देशालाही उत्तमोत्तम अभियंते मिळतील. राष्ट्रीय अभियांत्रिकी दिनाच्या सर्व अभियंत्यांना खूप शुभेच्छा !!

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *