राष्ट्रीय शिक्षण दिन : शिक्षण असावे अधिक आनंददायी आणि व्यवसायाभिमुख
राधिका अघोर
देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त देशात ११ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करत, अधिकाधिक लोकांना औपचारिक शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीनं अनेक उपक्रम या दिवशी राबवले जातात, शाळांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
शिक्षण, सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, यावर अबुल कलाम यांचा विश्वास होता. त्यामुळेच प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा हक्क असलाच पाहिजे याबद्दल ते आग्रही होते. त्याशिवाय भारतात उच्च शिक्षण संस्था उभारल्या जाव्यात ह्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला. आजही परिवर्तनाचे साधन म्हणून शिक्षणाला महत्त्व आहे, केवळ व्यक्तीच नाही, सात संपूर्ण समाजाला, सुसंस्कृत आणि प्रागतिक करण्यात शिक्षणाची भूमिका महत्वाची आहे. आज भारतात साक्षरतेचं प्रमाण समाधानकारक आहे, गावागावात शाळा पोचल्या आहेत. त्यांची संख्या अधिक वाढायला हवी असली, तरी किमान प्राथमिक शिक्षण मिळवणे जवळपास सगळयांना शक्य झाले आहे.
अशा वेळी, सुशिक्षित पिढी, सक्षम, सुसंस्कृत झाली आहे, का हा विचार आपण करायला हवा आणि जर तसं नसेल, तर आपली शिक्षणपद्धती कुठे चुकते आहे, त्यात काय त्रुटी राहिल्या आहेत, याचा आढावा घ्यायला हवा, त्यावर विचारमंथन करायला हवं.
आपल्या शिक्षण क्षेत्राकडे बघितलं तर, शहरी भागातल्या चांगल्या मात्र महागड्या खाजगी, विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या शाळा, ज्यात, आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असलेल्या मुलांना शिक्षण घेता येतं. तर, दुसरीकडे गावात किंवा निमशहरी भागात असलेल्या साध्या शाळा, त्यातही विनाअनुदानित शाळांमध्ये आर्थिक टंचाईमुळे चांगले शिक्षक किंवा चांगल्या सुविधा मिळत नाही.
अशा दोन स्तरातल्या शाळा असल्यानं, मुलांच्या शिक्षणाच्या दर्जात कमालीची तफावत आढळते. आर्थिक स्तर, किंवा शहरी- ग्रामीण भाग यावर मुलांचा शिक्षणाचा दर्जा ठरू नये, मात्र दुर्दैवाने असं होत आहे. ही त्रुटी दूर करत गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांना उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करायला हवेत.
आज तंत्रज्ञान खूप प्रगत झालं आहे, ह्या तंत्रज्ञानाचा शिक्षण व्यवस्थेत उपयोगही होतो आहे. मात्र, गुगल सारख्या साधनांनी माहितीची सहज उपलब्धता असल्याने, विद्यार्थ्यांना ज्ञानासाठी कष्ट घेण्याची, पुस्तकं, शब्दकोश, संदर्भ ग्रंथ बघण्याची, अभ्यास करण्याची इच्छा उरली नाही. एकप्रकारचा आळस निर्माण झाला आहे. शिक्षण, शिक्षक याविषयीचे गांभीर्य कमी झाले आहे. ज्ञानाची लालसा कमी होऊन, केवळ परीक्षेत उत्तीर्ण होणे एवढाच शिक्षणाचा उपयोग राहिला आहे. आणि शिक्षणाचे व्यावसायिकरण, पर्यायाने अधोगती होण्यासही हीच बाब कारणीभूत आहे.
शिक्षण क्षेत्राचे व्यावसायिकरण थांबवण्यासाठी मूल्यशिक्षण देणेही अत्यंत आवश्यक आहे. नागरिकशास्त्रावर भर देत, विद्यार्थ्यांना समाजात वर्तन करण्याची पद्धत, नागरिकशास्त्राचे नियम शिकवले गेले पाहिजे. समाज, देशाप्रती असलेली कर्तव्य शिकवली पाहिजेत. तरच शिक्षणासोबत, सुसंस्कृत पिढीही आपण निर्माण करु शकू. बदलत्या काळात, अत्याधुनिक तंत्रज्ञान अंगिकारत असतांना, आपली मूळ संस्कृती विसरायला नको, माणसाचं माणूसपण हरवायला नको. असं झालं तरच शिक्षण, सामाजिक परिवर्तनाचे माध्यम असावं हा अबूल कलाम यांचा विचार प्रत्यक्षात आणता येईल.
आपल्या शिक्षण पद्धतीत आणखी एक महत्वाची सुधारणा करायला हवी, ती म्हणजे, शिक्षण आनंददायी असावे. आज शाळांमधे शिक्षण, अभ्यास ह्या गोष्टी मुलांना कंटाळवाण्या किंवा अनेकदा ताण तणाव देणाऱ्या असू शकतात. त्यामुळे शाळा त्यांना आवडत नाही. त्यामुळे ज्ञान मिळवण्याचा उद्देश बाजूला राहतो, आणि त्यातून नुसते कोरे, माहिती मेंदूत कोंबलेले विद्यार्थी बाहेर पडतात. त्यासाठी अभ्यासक्रमात सुधारणा करायला हवी. अभ्यासक्रम अधिक सुलभ, आणि रोचक करायला हवा आणि शिक्षकांनीही अभिनव कल्पना शोधून काढत, शिक्षण अधिक आनंददायी कसे होईल, याचा प्रयत्न करायला हवा.
मुलांना कोणत्या विषयात गोडी आहे, कशात गती आहे, हे समजून घेत, त्या क्षेत्रात जाण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. सर्व विद्यार्थी, शिक्षक, शाळा संचालक, आणि शिक्षणक्षेत्राशी संबंधितांना राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या शुभेच्छा !