नाशिकमध्ये पावसाची संततधार, नदी नाल्यांना पूर
नाशिक, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. गेल्या ५ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने सर्व नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, धरणेही काठोकाठ भरली आहेत. जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा पेठसह तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टीची झाली. तर निफाड, सिन्नर, दिंडोरी, कळवण, मालेगाव नांदगाव येवला तालुक्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे.
गंगापूरसह अन्य धरण समूहांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने गोदावरीसह अन्य नद्या दुथडी वरून वाहत आहे. उद्या मंगळवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असून, गोदावरी आणि दारणा नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नांदूरमधमेश्वर धरणातून सर्वाधिक 62,371 क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक शहरात गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून गोदापात्रातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागल्याने पूरस्थिती कायम आहे. शहरातील टपऱ्यांमध्ये पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले असून, परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणचा वीजपुरवठाही खंडित झाला.
संततधार पाऊस सुरू असल्याने अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. सुरगाणा, पेठ तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.
ML/ML/PGB
26 Aug 2024