गोदा पात्रातील जलपर्णी काढण्यासाठी नाशिक मनपाची विशेष मोहीम

नाशिक, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिकमध्ये २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक मनपाने गोदावरी नदीपात्राच्या स्वच्छतेची जोरदार मोहिम हाती घेतली आहे. गोदावरीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या वनस्पतींमुळे पाण्याच्या पृष्ठभागावर हिरवा थर तयार झाला आहे. गोदावरी नदीपात्रात अल्पावधीतच फोफावलेली पानवेली काढण्यासाठी आता नाशिक महापालिका कोटय़वधी रुपये खर्च करणार आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ट्रॅश स्किमर यंत्र चालविण्यासह त्याच्या देखभाल व दुरुस्तीसाठी महापालिकेने २ कोटी १७ हजार ५४७ रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध केली आहे.
गोदा नदीकाठावर पुढील दोन वर्षांत कुंभमेळा भरणार असल्याने गोदावरी नदी पात्राची स्वच्छता मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यातच स्मार्ट सिटी कंपनीने पालिकेकडे सोपवलेले ट्रॅश स्किमर यंत्र आणि हे यंत्र चालवणार्या कंपनीचा करार संपला आहे. त्यामुळे पालिकेने पुढील पाच वर्षांसाठी या पानवेली काढण्याच्या कामासाठी २ कोटी २२ लाख १७ हजार ५४७ रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध केली आहे. पानवेली काढल्या तर गोदावरी प्रदूषणमुक्त होऊ शकते. मात्र त्यासाठी आतापर्यंत झालेले प्रयत्न हे केवळ मलमपट्टीसारखे दिसून आले आहेत. त्यामुळे आता निदान कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणारा हा कोट्यवधी रुपयांचा खर्च तरी सत्कारणी लागावा अशी अपेक्षा सामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे .
SL/ML/SL
8 March 2025