नाशिकहून दिल्लीसाठी दिवसातून आता दोन वेळा विमानसेवा….

 नाशिकहून दिल्लीसाठी दिवसातून आता दोन वेळा विमानसेवा….

नाशिक,दि.५ :- नाशिक-दिल्ली ही आठवड्यातून तीनच दिवसांवर मर्यादित करण्यात आलेली विमानसेवा आता पूर्ववत करण्यात आली असून ही सेवा आता दररोज दिवसांतून दोन वेळा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे नाशिक दिल्ली प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

नवी दिल्ली विमानतळावरील Runway (10/28) या धावपट्टीचे काम १५ जूनपासून सुरू करण्यात आल्याने नाशिक-नवी दिल्ली विमानसेवा रोजऐवजी आठवड्यातून तीनच दिवस इतकी कमी करण्यात आली होती. यामुळे नाशिकहून दिल्लीला जाणारे पर्यटक, नियमितपणे ये-जा करणारे व्यावसायिक यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. या अनुषंगाने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किनेझारापू राममोहन नायडू यांना १२ जुलै २०२५ रोजी पत्र लिहून नाशिक-दिल्ली विमान सेवा पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरू करण्याची मागणी केली होती.

सप्टेंबर 2025 मध्ये AAI मुख्यालय, नवी दिल्ली येथे 27 ऑक्टोबर 2025 ते 29 मार्च 2026 या वेळापत्रकासाठी स्लॉट्स निश्चित करण्याची बैठक होणार होती. यात विमान कंपन्या, विमानतळ ऑपरेटर आणि नागरी उड्डाण क्षेत्रातील घटक सहभागी होणार होते. या बैठकीत नाशिक-दिल्ली विमानसेवा पूर्ववत करणे हा विषय समाविष्ट करावा, तसेच ही सेवा Domestic Winter Schedule 2025 (WS 24) मध्ये पुन्हा सुरु करून दररोजची विमान सेवा चालू करावी, अशी मंत्री छगन भुजबळ यांची मागणी होती.

आता नवी दिल्ली विमानतळावरील धावपट्टीचे काम पूर्ण झाल्याने इंडिगो विमान कंपनीकडून २६ ऑक्टोबरपासून दिल्लीसाठी दररोज दोन वेळा विमानसेवा सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. यामुळे नाशिक ते दिल्ली असा विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

१८० आसनांचे हे विमान असेल, उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी प्रामुख्याने या विमानसेवेचा लाभ होणार आहे. एका दिवसात दिल्लीतील कामे उरकून नाशिकमध्ये परत येणे व्यापारी, व्यावसायिक यांना शक्य होणार आहे. तसेच नाशिकमध्ये विविध पर्यटन कंपन्या कार्यरत आहेत. उत्तर भारतातील पर्यटनस्थळी जाण्यासाठी पर्यटन कंपन्यांना नाशिकहून थेट दिल्ली विमानसेवा फायदेशीर पडणार आहे.

कुंभमेळ्यासाठी 25 कोटींपेक्षा अधिक भाविक गोदावरीच्या तीरावर येणार आहेत. त्यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देखील ही विमानसेवा महत्त्वाची ठरणार आहे. कुंभमेळ्यात उत्तर भारतातून नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांसाठी या विमानसेवेचा लाभ होणार आहे.

नाशिक हळूहळू देशातील सर्वच प्रमुख शहरांशी विमानसेवेने जोडले जात आहे. नवी दिल्ली, हैदराबाद, गोवा, नागपूर, बेंगळुरू, अहमदाबाद आदी ठिकाणांसाठी ही विमानसेवा आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिक-इंदूर-जयपूर विमानसेवा खंडित झाली होती. त्यामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थान येथे पर्यटनासाठी जाणान्यांची गैरसोय झाली होती. परंतु, आता इंडिगो कंपनीच्या वतीने २८ ऑक्टोबरपासून आठवड्यात दर मंगळवार, गुरुवार, शनिवार रोजी नाशिक-इंदूर-जयपूर आणि नाशिक-हैदराबाद अतिरिक्त विमान देखील सुरू करण्यात येणार आहे.

नाशिक हे देशातील एक वेगाने विकसित होणारे शहर असून या ठिकाणाहून देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या कारणास्तव ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे हे विमानतळ अधिकाधिक सुसज्ज करण्यासाठी तसेच जास्तीत जास्त शहरांना जोडले जाण्यासाठी मंत्री छगन भुजबळ हे सातत्याने प्रयत्नशील आहेत.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *