विधानसभेचे नवीन अध्यक्ष पुन्हा नार्वेकरच …

मुंबई, दि. ७ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : नव्याने स्थापित झालेल्या महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपदी मावळत्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हेच असतील असे चित्र आत्ताच्या घडीला दिसत आहे. भाजपामध्ये सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांची नावे या पदासाठी चर्चेला आहेत मात्र हे दोघेही या पदासाठी इच्छुक नसून त्यातल्या त्यात सहमतीचा उमेदवार म्हणून नार्वेकर यांनाच पुन्हा संधी मिळेल अशी चर्चा विधान भवन परिसरामध्ये आज पाहायला मिळाली. पंधरावे विधानसभेची स्थापना झाली असून आजपासून नव्या विधानसभेचे कामकाज सुरू झालं. आज नव्या सदस्यांना शपथ देण्याचा काम सुरू झालं असून ते उद्यापर्यंत सुरू राहणार आहे. सोमवारी नवीन विधानसभा अध्यक्षांची निवड होणार असून त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत आहे . विरोधी पक्षांकडे अत्यंत क्षीण सदस्य संख्या असल्यामुळे त्यांचा उमेदवार दिला जाईल अशी चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. त्यातच विधानसभेचे अध्यक्षपद हे भाजपाकडे असेल असे स्पष्ट आहे, त्यानुसार भाजपामधील नेमका कोणता नेता या पदासाठी निवडला जाईल याची चर्चा सध्या सुरू आहे .मंत्रिमंडळामध्ये वरिष्ठ सदस्यांना स्थान द्यायचे नाही असा एक मतप्रवाह भाजपा मध्ये असून त्यानुसार सुधीर मुनगंटीवार , चंद्रकांत पाटील यांची नावे नवीन मंत्रिमंडळात असणार नाहीत अशी चर्चा आहे . या दोघांपैकी एकाला विधानसभेचे अध्यक्ष पद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र हे दोघेही हे पद घेण्यास इच्छुक नाहीत त्यामुळे सध्या अध्यक्ष असणारे राहुल नार्वेकर हीच देवेंद्र फडणवीस यांची पहिली पसंती असू शकते. प्रत्यक्षात नार्वेकर यांना मंत्री पदाची अपेक्षा आहे मात्र त्यांना पुन्हा अध्यक्ष व्हावे लागेल असे दिसते.
भाजपाचे आशिष शेलार यांनी अध्यक्ष होण्याची तयारी दर्शवलेली आहे मात्र मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लक्षात घेता त्यांना सध्या अध्यक्ष पद अथवा मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल अशी चिन्हे नाहीत या पार्श्वभूमीवरती राहुल नार्वेकर हेच नवीन विधानसभेचे अध्यक्ष असतील असे चित्र सध्या तरी दिसत आहे.
ML/ ML/ SL
7 Dec. 2024