एसटीच्या विकासामध्ये NAREDCO ने योगदान द्यावे..!

 एसटीच्या विकासामध्ये NAREDCO ने योगदान द्यावे..!

मुंबई दि २६ : एसटी महामंडळाकडे राज्यभरात सध्या ८५० ठिकाणी मिळून एकूण १३ हजार एकर इतकी ” लँड बँक ” उपलब्ध आहे. नुकत्याच झालेल्या शासन निर्णयानुसार एसटीच्या जागेचा सार्वजनिक -खाजगी भागिदारीतून (PPP) विकास करण्यासाठी ४९+ ४९ वर्ष अशी एकूण ९८ वर्ष भाडे कराराची मुदत देण्यात आलेली आहे. या संधीचा फायदा घेऊन नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलने(NAREDCO) आपल्या अनुभव व कौशल्याच्या आधारे एसटीच्या विविध जागांचा विकास करून सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाचा वाटा उचलावा, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.

ते नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात बोलत होते. यावेळी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी, उपाध्यक्ष राजन बांदेलकर, महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष प्रशांत शर्मा , अभिनेते राहुल बोस यांच्या सह राज्यभरातील अनेक बांधकाम व्यवसायिक, घरबांधणी क्षेत्रांमध्ये पतपुरवठा करणाऱ्या विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल ही बांधकाम क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरची शिखर संस्था आहे. ही संस्था देशातील बांधकाम उद्योग व सर्वसामान्य जनता यांना जोडण्याचं काम करते.

राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार एसटी महामंडळाच्या जागा सार्वजनिक – खाजगी भागिदारी तत्वावर विकसित करण्यासाठी ९८ वर्षाचा भाडेकरार करण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्यभरात विविध शहरांमध्ये अगदी मोक्याच्या ठिकाणी एसटीच्या जागा आहेत. त्या विकसित करताना एसटीला आवश्यक असणाऱ्या आगार, बसस्थानके व इतर अनुषंगिक आस्थापना बांधून हस्तांतरित करण्याच्या अटीवर उर्वरित जागा संबंधित विकासकाला व्यावसायिक तत्त्वावर विकसित करून ती वापरण्यासाठी ९८ वर्षाच्या भाडेकराराने देण्यात येणार आहे.

नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल सारख्या संस्थेने या संधीचा फायदा घेऊन आपल्या अनुभव व कौशल्याच्या जोरावर राज्यभरातील बसस्थानकांचे रूपांतर बस पोर्ट मध्ये करावे व सर्वसामान्य जनतेला एक दर्जेदार परिवहन सेवा निर्माण करण्यामध्ये हातभार लावावा, असे आवाहन यावेळी मंत्री सरनाईक यांनी केले.

गुजरात मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे बस पोर्ट विकसित केले आहेत. तसे बस पोर्ट महाराष्ट्रात देखील या संस्थेच्या माध्यमातून विविध विकासकांनी पुढे येऊन विकसित करावेत. अर्थात, महाराष्ट्रातील करोडो सर्वसामान्य जनतेला प्रवासी दळणवळणाची सेवा देणाऱ्या एसटीच्या प्रगतीमध्ये राज्यातील विकासकांचे हे योगदान आम्ही कदापि विसरणार नाही, असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *