नांदेड जिल्ह्यात पुन्हा ढगफुटी, पिके पाण्याखाली …

नांदेड दि २८– नांदेड जिल्ह्यात पावसाला पुन्हा सुरुवात झाली असून काल दुपार नंतर, कधी हलका तर कधी मध्यम तर कधी जोराचा पाऊस. आज सकाळपासून पावसाला जोरात सुरुवात झाली आहे. लोहा तालुक्यातील कापशी व आजूबाजूच्या परिसरात मोठा ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेकडो हेक्टर जमिनीवरील पिके पूर्ण पाण्याखाली गेली आहेत. पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे.
सद्यपरिस्थितीत नांदेड जिल्ह्यास दुपारी ०१:०० वाजेपर्यंत ऑरेंज अलर्ट असून जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस चालू आहे. आज सकाळी १० वाजता जिल्ह्यातील बिलोली, मुखेड, कंधार, नायगाव या चार तालुक्यातील १७ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. निझामसागर धरणातून सकाळी १० वाजता २४ गेट उघडून १,९९,२४४ क्युसेक्स वेगाने विसर्ग चालू आहे. तसेच श्रीराम सागर प्रकल्पातून सुद्धा ३९ दरवाजे उघडून २,७६,००० क्युसेक्स वेगाने गोदावरी नदीत विसर्ग चालू आहे. तरी धर्माबाद, बिलोली, देगलूर या गावातील नदीकाठच्या गावातील लोकांना सुरक्षित जागी स्थलांतरित करण्यात आले आहे व सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. नागरिकांनी पूल, नाल्यावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे.ML/ML/MS