काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा अर्ज दाखल

 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा अर्ज दाखल

मुंबई, दि. २९ एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या रॅलीत हजारो लोक उपस्थित होते. त्याआधी सकाळी नाना पटोले यांनी चारभट्टीचा बजरंगबली आणि गोपीपुरी बाबाच्या समाधीवर जाऊन दर्शन घेतले तसेच आईचे आशीर्वादही घेतले. अर्ज दाखल करण्यास जाण्याआधी पत्नीने नाना पटोले यांचे औक्षण केले यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य आणि सहकारी आवर्जून उपस्थित होते.

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपा सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली, शेतकरी उद्ध्वस्थ झाला, महिला सुरक्षित नाहीत पण भाजपा युती सरकारला त्याची काळजी नाही. गरिबांना हक्काची जमीन मिळावी यासाठी लढा देऊन आपण वन हक्क कायदा आणला पण गरिबांना जमिनी देण्यापेक्षा भ्रष्ट भाजपा सरकारने अदानी, अंबानीला जमीन देण्यास प्राधान्य दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान संपवण्याचे काम भाजपा सरकार करत आहे. युपीएससीच्या परीक्षा न घेता आरएसएसच्या विचार सरणीच्या मुलांची थेट संयुक्त सचिव पदावर भरती केली जात आहे. एमपीएससीच्या माध्यमातूनही रिक्त जागा वेळेवर भरल्या जात नाहीत. राज्यात शासकीय आणि निमशासकीय कर्माचाऱ्यांची भरती आता ठेकेदारी पद्धतीने सुरु करून मागासवर्गीयांचे या नोकऱ्यातील आरक्षण संपवले जात आहे. जिल्हा परिषदेच्या शाळाही बंद करण्याचा घाट घातला आहे. श्रीमंतापेक्षा गरिबांना जास्त कर द्यावा लागतो, हे सर्व पाप भाजपा सरकारचे आहे.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर एमपीएससी मार्फत सर्व जागा भरल्या जातील तसेच परिक्षेसाठी नाममात्र शुल्क आकारले जाईल. परिक्षेच्या नावाखाली विद्यार्थ्यांना लुटले जाणार नाही. महिलांना भाजपा सरकार जी मदत करत आहे त्याच्यापेक्षा जास्त मदत देऊ, महागाई कमी करण्याचा प्रयत्न करु. छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराला गाडणाऱ्या भाजपा युती सरकाला जमिनीत गाडणे हाच आमचा उद्देश असून या सरकारला खाली खेचून मविआचे सरकार आणण्यासाठी आज साकोलीतून रणशिंग फुंकले आहे, असे नाना पटोले म्हणाले.यावेळी माजी मंत्री बंडू सावरबांधे, सतीश चतुर्वेदी, आमदार अभिजित वंजारी, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ML/ ML/ SL

29 October 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *