दंगली आणि दलित अत्याचाराचे गुजरात मॉडेल महाराष्ट्रात

 दंगली आणि दलित अत्याचाराचे गुजरात मॉडेल महाराष्ट्रात

मुंबई , दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):
अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील हेरगाव येथे कबुतर चोरल्याच्या संशयावरून एका दलित तरुणाला अर्धनग्न करून झाडाला बांधून अमानुष मारहाण करण्यात आली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. भारतीय जनता पक्षाने राजकीय फायद्यासाठी समाजात जो द्वेष पसरवला आहे, त्यातूनच या घटना घडत आहेत. भाजपने देशाच्या सामाजिक ऐक्याला गालबोट लावले आहे अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील घटनेचा तीव्र निषेध करून पटोले म्हणाले की, राजकीय फायद्यासाठी भारतीय जनता पक्षाने देशात द्वेषाची बीजे रोवली आहेत त्याचा परिणाम देशवासियांना भोगावे लागत आहेत. भाजपने राजकीय फायद्यासाठी हिंदू आणि मुस्लीम समाजात फूट पाडून दंगली घडवल्या. त्यानंतर भाजपने सवर्ण आणि दलितांमध्ये फूट पाडण्याचे काम सुरु केले आहे. त्यातून अगोदर भीमा कोरेगावची दंगल घडवली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी संबंधित लोक सातत्याने मुस्लीम आणि दलितांबद्दल द्वेषाची पेरणी करत आहेत.
त्यातूनच सामाजिक ऐक्याला तडे गेले असून हेरगाव सारख्या घटना घडत आहेत. या घटनेतील आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पटोले यांनी केली.

फोडाफोडीचे राजकारण करून केंद्रीय संस्थांचा गैरवापर करून भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीचे सरकार पाडले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही फुटीरांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले. अनैतिक मार्गाने सत्तेवर आलेले हे असंवैधानिक आणि भ्रष्ट सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे.
सरकारच्या कामगिरीवर यांना मते मागायला तोंड नाही.

अनेक सर्वे अहवालांनी भाजपच्या दारुण पराभवाचे भाकीत केले आहे. त्यामुळेच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचे आणि दलित अत्याचाराचे गुजरात मॉडेल महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न करत आहे. पण राज्यातील जनता सुज्ञ असून ती भाजपचा कुटील डाव ओळखून आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

ML/KA/PGB 27 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *