नामदेव ढसाळांचा जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दलित पँथरचे संस्थापक आणि वंचितांवरील अन्यायाविरोधात व्यवस्थेविरोधात एल्गार पुकारणारे कवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांचा जीवन प्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. द बायोस्कोप फिल्म्सने बंडखोर कवी नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘ढसाळ’ (Dhasal Movie) या बायोपिकची घोषणा केली. या चित्रपटाच्या निर्मितीचे अधिकार नामदेव ढसाळ यांच्या कुटुंबाकडून अधिकृतपणे घेतले आहेत. दोन वर्षांच्या अत्यंत सखोल संशोधन आणि अभ्यासानंतर हा चित्रपट नामदेव ढसाळ यांच्या प्रभावी आणि प्रेरणादायी जीवनाचा वेध घेण्यास तयार होत आहे. ‘ढसाळ’ या चित्रपटाची निर्मिती सप्टेंबर 2024 मध्ये सुरू होऊन 2025 मध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती संजय पांडे करत असून वरुण राणा हे दिग्दर्शन करणार आहेत. नामदेव ढसाळ यांच्या बायोपिकमध्ये ढसाळ यांच्या अन्याय आणि शोषणाविरुद्धच्या संघर्षाचे वास्तववादी चित्रण करण्यात येणार आहे. निर्माते संजय पांडे यांनी म्हटले की, ”पद्मश्री नामदेव ढसाळ म्हणजे वादळ. शोषित आणि अन्यायाने पिडलेल्या दलित समाजाला नवसंजीवनी देणारा, शब्दात विद्रोहाची आग असलेला पँथर अशी नामदेव ढसाळ यांची ओळख म्हणावी लागले. महाराष्ट्राच्या साहित्याला ग्लोबल करणारा पहिला कवी. त्यांचं जीवन चरित्र म्हणजे एक ज्वलंत मशाल आहे. महाराष्ट्राचं काय संपूर्ण देशात दलित पॅंथरने एक राजकीय आणि सामाजिक वादळ तयार केलं होतं. त्यांच्या जीवनावर चित्रपट करणे हे एक निर्माता म्हणून आव्हान असल्याचे त्यांनी म्हटले.
नामदेव ढसाळ यांच्या पत्नी आणि लेखिका मल्लिका अमर शेख यांनी म्हटले की, नामदेवच समग्र कलंदरपण, विचारीपण, कविमन आणि माणसांप्रती असलेला प्रचंड जिव्हाळा या साऱ्या गोष्टी आपल्याला त्यांच्या ढसाळ चित्रपटातून दिसून येईल. या चित्रपटात नामदेवच नाही तर त्याच्या समग्र जीवनाबरोबरच त्यावेळची क्रांतिकारक परिस्थिती, त्यावेळचं राजकारण, पूर्ण दलित पँथर ची दहशत असलेली चळवळ असं सर्वांगीण समाजाचाच लेखाजोगा उभा राहील. एक चित्रपट नसून ऐतिहासिक ‘बखरनामा’ असल्याचे मल्लिका अमर शेख यांनी म्हटले.
नामदेव ढसाळ यांच्या कविता, लेख हे साहित्य विश्वात महत्त्वाचे समजले जातात. नामदेव ढसाळ यांच्या कवितेची विशिष्ट शैली होती. साहित्य आणि चळवळीत ढसाळ अग्रसेर होते. त्यांनी साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा, वेदनांना वाचा फोडली. ढसाळांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर मोठा प्रभाव होता. त्यांनी काव्य, गद्य, वृत्तपत्रांतील स्तंभलेखन यातून आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार मांडले. त्यांच्या क्रांतिकारी साहित्याची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली. 1973 मध्ये नामदेव ढसाळ यांचा पहिला कवितासंग्रह गोलपिठा प्रकाशित झाला. मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले हा माओवादी विचारांवर आधारित, तर प्रियदर्शिनी हा त्यांचा इंदिरा गांधी यांच्या विषयीचा कविता संग्रह आहे. त्यांनी विशिष्ट शैलीने मराठी कवितेत मोलाची भर घातली. त्यांनी भाषिकदृष्टया प्रमाण मराठी भाषेपेक्षा वेगळी भाषा वापरली. मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.
तुझे बोट धरून चाललो आहे मी, तुही इयत्ता कंची, मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले , या सत्तेत जीव रमत नाही, मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे (निवडक कवितांचा संग्रह) हे त्यांचे काही निवडक कथासंग्रह आहेत.
SL/KA/SL
15 Feb. 2024