नालेसफाईच्या निविदा काढण्याची मागणी
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :गेल्यावर्षी प्रमाणे याहीवर्षी मुंबईतील मोठ्या नाल्यांच्या साफसफाईच्या निविदा अद्याप काढण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे साफसफाईच्या कामांना विलंब होण्याची शक्यता लक्षात घेऊन याकडे पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
पावसाळ्या पुर्वी दरवर्षी मुंबईतील सुमारे 309 मोठ्या नाले, 508 छोटे नाले, 5 नद्या आणि रस्त्या लगतची छोटी गटारे यातील गाळ काढण्याची कामे करावी लागतात. साधारणतः मार्च महिन्याच्या अखेरीस अथवा एप्रिल पासून पुर्ण क्षमतेने नालेसफाईच्या कामांना सुरुवात केली तरच ती कामे वेळेत पुर्ण होतात .
मात्र यावर्षी अद्याप नालेसफाईच्या कंत्राटाच्या निविदाच काढण्यात आलेल्या नाहीत. जर ही निविदा प्रक्रिया वेळीच पुर्ण न झाल्यास प्रत्यक्ष कामे वेळीच सुरु होणार नाहीत. गतवर्षी अशा प्रकारे निविदा प्रक्रिया उशिरा सुरु झाली होती त्यानंतर विलंबाने प्रक्रिया सुरु झाली खरी मात्र त्याचा कामांवर परिणाम झाला होता.गतवर्षीचा अनुभव लक्षात न घेता पुन्हा याही वर्षी प्रशासनाने निविदा प्रक्रियेला उशीर केला आहे .
ज्या पध्दतीने छोट्या नाल्यांची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे तशीच मोठ्या नाल्यांच्या कामांची निविदा तातडीने काढण्यात याव्यात. तसेच निविदा प्रक्रिया पारदर्शक असावी . मागिल काळात काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारांना या मध्ये समावेश करण्यात येऊ नये.
निविदेपासून साफसफाई पर्यंत संपूर्ण कामांचा कालबद्ध कार्यक्रम तयार करावख
कामे वेळेत सुरु व्हावीत, यामध्ये भ्रष्टाचार होणार नाही, गाळ संपूर्ण काढला जाईल या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात यावी.असे आशिष शेलार यांनी आयुक्तांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे .
ML/KA/PGB
7 Jan 2022