गाळ काढलेल्या नाल्यांमध्ये नागरिकांनी कचरा टाकू नये

 गाळ काढलेल्या नाल्यांमध्ये नागरिकांनी कचरा टाकू नये

मुंबई दि.6( एम एमसी न्यूज नेटवर्क):मुंबईतील अनेक मोठ्या नाल्यांमध्ये नागरिकांनी टाकलेला तरंगणारा कचरा हा नाल्यातून गाळ काढण्याच्या कामातील सर्वात मोठा अडथळा आहे. अनेक भागात नाल्यातून गाळ काढल्यानंतरही त्यात पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार थांबत नाहीत. हा तरंगणारा कचरा नियमितपणे काढावा, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी वेलरासू यांनी पर्जन्य जलवाहिन्या विभागाला दिले. पूर्व उपनगरातील नाल्यातून गाळ काढून वाहून नेण्याच्या कामांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. वेलरासू यांनी आज पाहणी केली. त्यावेळी त्यांनी ठिकठिकाणी कामांची स्थिती पाहून संबंधितांना आवश्यक ते दिशानिर्देश दिले.मुंबईतील नाल्यांमध्ये टाकण्यात येणाऱ्या कचर्‍यामध्ये थर्माकॉल, प्लास्टिक पिशव्या, फर्निचर, रबर, रॕपर्स असा विविध प्रकारचा तरंगता कचरा (फ्लोटिंग मटेरिअल) नागरिकांकडून टाकण्यात येतो. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन विभागासोबत समन्वयाने हा तरंगता कचरा नाल्यात येण्यापासून कसा रोखता येईल, यादृष्टीने पर्जन्य जलवाहिन्या विभागाने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत महानगरपालिकचे अतिरिक्त आयुक्त श्री. वेलरासू यांनी व्यक्त केले. त्यादृष्टीने समन्वयासाठी बैठक लवकर आयोजित करावी, अशी सूचनाही त्यांनी पर्जन्य जलवाहिन्या विभागाला केली. छोट्या नाल्यांच्या ठिकाणी जाळ्या लावता येतील का अथवा ते नाले बंदिस्त करता येतील का? तसेच मोठ्या नाल्यांच्या ठिकाणी स्क्रिनिंग किंवा नेटचा पर्याय वापरता येईल का? याबाबतची चाचपणी करावी. नाल्यांमध्ये कचरा जाण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार निविदा प्रक्रिया सुरू करावी. नाल्यातून गाळ काढण्याच्या व्यतिरिक्त ही प्रक्रिया पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून राबवावी, असे निर्देशही त्यांनी दिले. आगामी वर्षभरात नाल्यातून नियमित गाळ आणि कचरा बाहेर काढले जाईल, याची कंत्राटदार नेमून जबाबदारी सुनिश्चित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.मुंबईतील नागरिकांची पावसाळ्यात कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पर्जन्य जलवाहिन्या विभाग अव्याहतपणे काम करत असतो. पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून महानगरपालिका क्षेत्रात नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम वेगाने केले जात आहे. पूर्व उपनगरात सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या नियोजित कामांचे उदिष्ट वेळेत पूर्ण करावे, अशी सूचनाही या पाहणी दौऱ्यात निर्देश श्री. वेलरासू यांनी केली.नाल्याच्या नजीकच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी नाल्यात थेट कोणताही कचरा न टाकता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाला सहकार्य करण्याची गरज असल्याचे मत उपआयुक्त श्री. उल्हास महाले यांनी व्यक्त केले. भरतीच्या काळात नाल्यातून तरंगणारा कचरा आणि गाळ काढण्याच्या कामात अनेक अडथळे निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी तुंबण्याची गैरसोय टाळण्यासाठी कचरा नाल्यात न टाकता सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. • या भागातील नाल्यांच्या कामाची पाहणी*मुंबईतील शहर भागात दादर, धारावी नाल्यातून गाळ काढण्याच्या कामाची पाहणी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी केली. त्यानंतर पूर्व उपनगरात ए. टी. आय. नाला, व्ही. एन. पुरव मार्ग (चेंबूर), माहूल नाला, वसंतदादा पाटील महाविद्यालय (प्रियदर्शनी), रफी नगर नाला (गोवंडी), पीएमजीपी नाला, घाटकोपर मानखुर्द जोड रस्ता, मानखुर्द नाला, लक्ष्मीबाग नाला, पूर्व द्रुतगती महामार्ग (घाटकोपर), जॉली बोर्ड नाला, ९० फीट रोड (कांजूरमार्ग), बाऊंड्री नाला (मुलुंड) या भागातील कामांची पाहणी केली. दिनांक ३१ मे २०२३ पर्यंत नाल्यातून गाळ काढण्याची कामे वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण करण्याचे निर्देशही अतिरिक्त आयुक्त श्री. वेलरासू यांनी यंत्रणेला दिले.

ML/KA/PGB 6 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *