अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरला ‘बेस्ट अक्ट्रेस’चा विशेष ज्युरी पुरस्कार!

 अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरला ‘बेस्ट अक्ट्रेस’चा विशेष ज्युरी पुरस्कार!

मुंबई, दि १८
मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर काही काळ ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा एकदा दमदार पुनरागमन करत चर्चेत आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या १२व्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवात (२०२२–२३) तिच्या मोग या कोंकणी चित्रपटासाठी तिला ‘बेस्ट अॅक्ट्रेस’चा विशेष ज्युरी पुरस्कार जाहीर झाला.

जोजो डिसुझा दिग्दर्शित मोग ही प्रेम, संघर्ष आणि मानवी नात्यांची कहाणी सांगणारी फिल्म आहे. यात नक्षत्राने साकारलेली सेलिना ही साधी पण भावनिक गुंतागुंतीत सापडलेली व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. मराठी पार्श्वभूमी असूनही तिने या भूमिकेसाठी शून्यापासून कोंकणी भाषा शिकली, गोव्यातील घराघरांत बोलली जाणारी कोंकणी–मराठी मिसळलेली बोली आत्मसात केली आणि स्थानिक उच्चारांवर मेहनत घेतली. तिच्या या प्रामाणिक तयारीमुळे सेलिनाला वास्तवाचा स्पर्श मिळाला आणि ज्युरींनी तिच्या अभिनयाला विशेष दाद दिली. सेलिना ही भूमिका केवळ नायिकेची नाही, तर संपूर्ण कथानकाचा भावनिक आधारस्तंभ ठरते.

या महोत्सवात मोगला एकूण ८ पुरस्कार मिळाले, ज्यात सर्वोत्कृष्ट कोंकणी चित्रपट हाही मानाचा समावेश आहे. गोवा राज्य सरकारतर्फे आयोजित या फेस्टिव्हलचा समारोप पणजीतील कला अकादमी येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. गोवा राज्य चित्रपट महोत्सव हा स्थानिक चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानाचा सोहळा मानला जातो, आणि या व्यासपीठावर मिळालेला पुरस्कार नक्षत्राच्या कारकिर्दीत महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

नक्षत्राचा प्रवास मालिकांपासून मोठ्या पडद्यापर्यंत गेला आहे. माझीया माहेरा मधील पल्लवी, लेक माझी लाडकी मधील सानिका, सुर राहू दे मधील आरोही आणि चंद्र आहे साक्षीला मधील सुमन काळे या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. तर फत्तेशिकस्तमधील बहू बेगम, प्रीतममधील सुवर्ण, तसेच सापळा, मुक्ताई आणि अलीकडील ऑल इज वेलमधील तिच्या मुख्य भूमिकांनी तिला चित्रपटसृष्टीत वेगळं स्थान मिळवलं.

पुरस्कार स्वीकारताना नक्षत्रा म्हणाली :
“हा सन्मान माझ्यासाठी फक्त पुरस्कार नाही, तर नव्या प्रवासाची सुरुवात आहे. मोगसाठी मी भाषा शिकण्यापासून व्यक्तिरेखेचं वास्तव पकडण्यापर्यंत मेहनत घेतली आणि त्या प्रयत्नाची दखल घेतल्याचा मला आनंद आहे. हा पुरस्कार मला आणखी जबाबदारी देतो — दर्जेदार, प्रामाणिक आणि प्रेक्षकांच्या मनात ठसतील अशा भूमिका साकारत राहण्याची. मग ते टीव्ही असो, वेब सिरीज असो किंवा चित्रपट — मी प्रत्येक माध्यमासाठी तयार आहे.”

या सन्मानामुळे नक्षत्रा मेढेकरचं पुनरागमन अधिक प्रभावी झालं असून प्रेक्षक आणि रसिक तिच्या पुढील कामाची आतुरतेने वाट पाहत आहेत.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *