निवडणूक आयोगाने नाकारले भाजपचे प्रचारगीत
मुंबई, दि. 7 : देशातील सर्वांत श्रीमंत महानगर पालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई मनपाच्या निवडणूकीसाठी सर्व पक्ष जोरदार तयारी करत आहेत. राज्यात आणि केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपाला तर आपण कधी एकदा मुंबईची सत्ता हाती घेतो असे झाले आहे. त्यादृष्टीने भाजप सर्वबाजूंनी मोर्चेबांधणी करत आहे. प्रचाराच्या या धामधुमीत पक्ष आणि उमेदवारांवर लक्ष ठेवून असलेल्या राज्य निवडणूक आयोगाने भाजपने खास मुंबई मनपा निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले प्रचारगीत नाकारले आहे.
या गीतात ‘भगवा’ या शब्दाचा समावेश असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने हे गीत निवडणूक आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन करणारे ठरवले आहे आणि त्याला परवानगी नाकारली आहे. भाजपकडून या प्रचारगीताचे गायन अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी केले होते. गीतात पक्षाचे कार्य आणि भविष्यातील योजना यासह स्थानिक मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र, आयोगाच्या निकषानुसार, धर्म, प्रतीक किंवा पक्षाचे रंग यांचा थेट प्रचार करणे आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन ठरते, आणि त्याच आधारावर या गीताला नकार दिला गेला.
आयोगाने सांगितले की, या गीतामध्ये निवडणूक कायद्याचे काही नियम पाळलेले नाहीत आणि त्यातून मतदारांवर अप्रत्यक्ष प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे. निर्णयामुळे भाजपच्या प्रचार मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. पक्षाला आता या गीताऐवजी नवीन, नियमांनुसार योग्य प्रचार साहित्य तयार करून लोकांपर्यंत पोहोचवावे लागेल.
SL/ML/SL