नागरी सोयी-सुविधा पाहून भारावले हैदराबाद महानगरपालिकेचे शिष्टमंडळ

 नागरी सोयी-सुविधा पाहून भारावले  हैदराबाद महानगरपालिकेचे शिष्टमंडळ

मुंबई , दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबई महानगरपालिकेच्या दोन दिवसीय भेटीवर आलेल्या हैदराबाद महानगरपालिकेच्या शिष्टमंडळाने मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचे विशेष कौतुक केले.पालिकेच्या क्षेत्रातील नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा पाहून शिष्टमंडळ भारावून गेले. मुंबई महानगरपालिकेची प्रशासकीय संरचना, नागरी सेवा-सुविधा, पायाभूत सुविधा, इत्यादींचा अभ्यास करण्यासाठी २५ आणि २६ एप्रिल २०२३ असे दोन दिवस हैदराबाद महानगरपालिकेचे पाच सदस्यीय शिष्टमंडळ बृहन्मुंबई महानगरपालिकेला भेट देण्यासाठी आले होते. त्यांनी मुंबई महानगरपालिकेचे विविध विभाग, प्रकल्प, तसेच एच पश्चिम विभाग कार्यालय आणि वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाला भेट देऊन माहिती जाणून घेतली. या शिष्टमंडळात हैदराबाद महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती व्ही. ममता, उप आयुक्त श्रीमती व्ही. प्रशांती, पी. श्रीनिवास राव, अधीक्षक एस. सी. श्रीवास्तव आणि अधीक्षक हरीबाबू यांचा समावेश होता. या भेटीदरम्यान पहिल्या दिवशी, काल महानगरपालिका मुख्यालयात उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. त्यानंतर संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विविध विभागवार रचना, परिमंडळ रचना, उपनगरांची रचना, नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा यासह महानगरपालिकेच्या कामकाजाबाबत माहिती देण्यात आली. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत संकलित केला जाणारा कचरा आणि त्यावर केली जाणारी प्रक्रिया, नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत करण्यात येणारी जनजागृती यांची संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून कार्यकारी अभियंता नितीन परब यांनी माहिती दिली. यावेळी प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) प्रशांत तायशेटे उपस्थित होते. यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाला शिष्टमंडळाने भेट दिली. संचालक (आपत्ती व्यवस्थापन) महेश नार्वेकर यांनी आपत्कालिन व्यवस्थापन विभागाचे कामकाज, नियंत्रण कक्ष, सुरक्षेबाबत नागरिकांना दिले जाणारे प्रशिक्षण, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. प्रमुख अधिकारी (आपत्ती व्यवस्थापन) रश्मी लोखंडे यावेळी उपस्थित होत्या. महानगरपालिकेच्या एच पश्चिम विभाग कार्यालयादेखील शिष्टमंडळाने भेट दिली. सहायक आयुक्त विनायक विसपुते यांनी शिष्टमंडळाला विभागाच्या कामकाजासह घनकचरा व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. विभागातील वीज बिल भरणा पद्धत, पाणी बिल भरणा पद्धत यासह कररचना पद्धतीची माहिती शिष्टमंडळाने उत्सुकतेने जाणून घेतली. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाला शिष्टमंडळाने आज भेट दिली. उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी जितेंद्र परदेशी यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. त्यांनी शिष्टमंडळाला वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयासंदर्भात सविस्तर माहिती दिली. उद्यानातील विविध सोयी-सुविधा, प्राणिसंग्रहालय, स्मार्ट गांडूळखत सिस्टीम व सेंद्रीय शेती प्रकल्पालाही भेट दिली. उद्यानाची देखभाल व उद्यानाला भेटी देण्यासाठी आलेल्या नागरिकांना पुरवण्यात येणाऱया सेवा-सुविधांसह इतर गोष्टींचे शिष्टमंडळाने विशेष कौतुक केले.

ML/KA/PGB 26 APR 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *