नागपूर -पुणे वंदे भारत आजपासून सुरू

नागपूर दि १०– नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक आठ येथून नागपूर अजनी पुणे या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. यावेळेला नागपूर रेल्वे स्थानकावर शुभारंभ प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या वंदे भारत त्यांच्या ट्रायल रन चा अनुभव घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी आणि नागरिक सुद्धा उपस्थित होते. यावेळेला केंद्रिय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी आणि प्रवाशांशी संवाद साधीत वंदे भारत ट्रेन ची पाहणी देखील केली.
यावेळेला मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मराज मीना यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यक्रम स्थळी स्वागत केले.
नागपूर पुणे वंदे भारत रेल्वे चा वेळ कमी होण्यासाठी थेट नगर ते पुणे असे रेल्वे लाईन तयार करण्याचा प्रस्ताव आपण केंद्रीय रेल्वेमंत्री समोर मांडणार असून छत्रपती संभाजी नगर ते पुणे या नव्या एक्सप्रेस वे च्या बाजूने जर नागपूर पुणे वंदे भारत ची लाईन टाकता आली तर नागपूर ते पुणे हे रेल्वे अंतर सुमारे 100 किलोमीटरने कमी होईल अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर मध्ये दिली. नागपूरच्या रेल्वे स्थानकावर नागपूर पुणे या सर्वात लांब रूट असलेल्या वंदे भारत ट्रेनला हिरवी झेंडे दाखवल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
भारतातील सर्वात जास्त म्हणजे ८८१ किमी लांबीच्या मार्गावर धावणारी ही पहिली वंदे भारत गाडी आहे. आज या नवीन रेल्वेमुळे ज्या प्रवासाला 16 ते 17 तास लागत होते ते अंतर केवळ आता बारा तासात कापणे शक्य होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले.