‘पीएम आवास योजने’मध्ये नागपूर विभाग राज्यात प्रथम

 ‘पीएम आवास योजने’मध्ये नागपूर विभाग राज्यात प्रथम

नागपूर,दि.२१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत राज्यात उत्कृष्ट विभाग, सर्वोत्कृष्ट जिल्हा तसेच राज्य पुरस्कृत आवास योजना आदी श्रेणींमध्ये सरस कामगिरीसाठी नागपूर विभागाला “महाआवास अभियान” पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.

महाआवास अभियान पुरस्कार 2021-22 मध्ये पीएम आवास योजनेत राज्यातील सर्वोत्कृष्ट विभाग म्हणून नागपूर विभागाला प्राप्त होणारा सन्मान विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी स्वीकारणार आहेत.
नागपूर विभागाला सर्वोत्कृष्ट विभाग म्हणून 41.8 गुण प्राप्त झाले आहेत. तसेच 70.8 गुण मिळवून भंडारा जिल्हा राज्यात प्रथम आला आहे. तर गोंदिया जिल्हा 61.1 गुण मिळवून राज्यात तृतीय ठरला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये नागपूर विभागाने 2 लाख 88 हजार 48 घरे बांधण्याच्या उद्दिष्टापैकी 2 लाख 64 हजार 71 घरकुलाचे बांधकाम (91.68 टक्के) करून उत्तम कामगिरी केली आहे .

पीएम आवास योजनेची नागपूर विभागाने उत्कृष्ट अंमलबजावणी करून सरस कामगिरी केली. राज्यातील सर्वोत्कृष्ट तालुक्यांमध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्याला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. तसेच बहुमजली इमारती बांधण्याच्या श्रेणीमध्ये भंडारा जिल्ह्यातील ताडगाव (मोहाडी) राज्यात प्रथम आले आहे. सर्वोत्कृष्ट गृह संकुलांच्या श्रेणीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मांजरा (रे) राज्यात द्वितीय तर नागपूर जिल्ह्यातील बुधला (कळमेश्वर) तृतीय ठरले आहे.

राज्य पुरस्कृत योजनेमध्येही नागपूर विभाग उत्कृष्ट
राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये विभाग स्तरावर नागपूर जिल्हा राज्यात द्वितीय ठरला आहे. तसेच सर्वोत्कृष्ट जिल्ह्यामध्ये भंडारा द्वितीय तर गडचिरोली जिल्हा तृतीय ठरला आहे. सर्वोत्कृष्ट तालुक्यांमध्ये भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुका राज्यात प्रथम आला आहे.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये मंजूर घरकुलांपैकी 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल अमरावती जिल्हा प्रथम तर भंडारा जिल्हा द्वितीय ठरला आहे. राज्य पुरस्कृत योजनेमध्ये चंद्रपूर जिल्हा द्वितीय ठरला आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनेतील बहुमजली इमारती श्रेणीमध्ये कामठी तालुक्यातील येरखेडा ग्रामपंचायत प्रथम आली आहे.

ML/KA/SL

21 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *