राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत नागपूरच्या बॉक्सर्सना सुवर्णपदक
नागपूर, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉक्सिग या प्रामुख्याने पंजाब, हरयाणा आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये खेळल्या जाणाऱ्या क्रिडाप्रकाराला आता महाराष्ट्रातील युवकही प्राधान्य देत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नागपूरमधील युवकांची कामगिरी पाहून अधिक तरुणांना या क्रीडा प्रकाराकडे वळण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच हरयाणा येथील रोहतकमध्ये खेलो इंडिया स्पर्धेच्या अंतर्गत राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करत कनिष्ठ गटात नागपूरच्या समीक्षा सिंगने सुवर्णपदक पटकावले. उत्तरप्रदेशच्या दिव्यांशीला मात देत समीक्षाने ही कामगिरी केली आहे. स्पर्धेत नागपूरच्या पाच मुष्ठीपटूंनी विविध वजनी गटात पदक जिंकले.
अनंत देशमुख याने उत्तरप्रदेशच्या रुप यादवचा पराभव करत सुवर्ण जिंकले. दुसरीकडे, स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे नागपूरच्या मल्हार साबळे याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. धैर्य कोठी, श्रद्धा खोब्रागडे यांनी देखील उत्तम कामगिरी करत कांस्य पदकाची कमाई केली. पदकप्राप्त सर्व खेळाडू नागपूरच्या मानकापूर मैदानात प्रशिक्षक गणेश पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. स्पर्धेत प्रशिक्षणात रौनक खंबाळकर याने खेळाडूंना सहकार्य केले.
SL/ML/SL
8 April 2024