कल्याण-नगर मार्गावर मृत्युचा हाहाकार! 11 प्रवाशांचा मृत्यू

 कल्याण-नगर मार्गावर मृत्युचा हाहाकार! 11 प्रवाशांचा मृत्यू

ठाणे दि १३ :
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर आज काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. एक सिमेंट मिक्सर आणि काळी-पिवळी इको टॅक्सी यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, इको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून गाडीचा सांगाडा ओळखणेही कठीण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायते पुलावर हा मोठा अपघात झाला, सकाळी ही घटना घडली. प्रवाशांनी भरलेली इको कार महामार्गावरून जात असताना समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सरने तिला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारमधील प्रवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. या कारमध्ये एकूण 12 प्रवासी होते, त्यापैकी 11 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली. एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात एक आजी मात्र आश्चर्यकारकरित्या बचावली आहे.

अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. चक्काचूर झालेल्या कारमधून मृतदेह बाहेर काढण्याचे काम स्थानिकांनी केले. टिटवाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मृतांचा अधिकृत आकडा अद्याप जाहीर केला नसला तरी, मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

हा अपघात नेमका कशामुळे झाला, चालकाचा ताबा सुटला की वेगाचा अतिरेक नडला, हे अद्याप समजू शकलेले नाही. टिटवाळा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करण्यात आली आहेत. या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला होता.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *