नदीवरील जुना पूल कोसळून ३० पर्यटक वाहून गेले, सहा जणांचा मृत्यू ….

पुणे दि १५– कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळल्याची घटना घडली आहे, प्राथमिक माहितीनुसार, २५ ते ३० पर्यटक नदीत बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे त्यापैकी दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत. उर्वरित लोकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या अपघातील सुमारे ३८ जणांना वाचविण्यात आले असून, त्यातील सहा जणांची प्रकृती गंभीर आहे, त्यांच्यावर पवना रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना तळेगाव दाभाडे शहराच्या लगत असलेल्या प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे घडली. रविवार असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होती. केवळ पादचाऱ्यांसाठी असणाऱ्या या पुलावर काही चारचाकी आणि दुचाक्या देखील होत्या आणि सुमारे शंभर जण यावेळी पुलावर जमा झाले होते. याच गर्दीत काही पर्यटक पुलावर थांबले असताना भार सहन न झाल्याने तीस वर्षे जुना असलेला हा लोखंडी पूल अचानक कोसळला आणि अनेक जण थेट नदीत पडले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून, बचावकार्य सुरू करण्यात आले आहे, पोलिस , एन डी आर एफ, स्थानिक नागतकृकांच्या सहाय्याने हे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगवान असून बचावकार्यात अडथळे येत आहेत.
दरम्यान, स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल आणि एनडीआरएफ पथक घटनास्थळी रवाना झाले असून, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेबाबत अजून अधिकृत दुजोरा मिळालेला नसला, तरी दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासन सतर्क झाले आहे. ML/ML/MS