‘नाच गं घुमा’ चा परदेशांतही डंका
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी कलाविश्वात सध्या परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे.या चित्रपटात मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव यांच्यासह सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, सारंग साठ्ये आणि बालकलाकार मायरा वायकुळ अशी जबरदस्त स्टारकास्ट आहे.या चित्रपटाचं सुंदर कथानक घराघरांतल्या प्रत्येक महिलेला भावलं. आतापर्यंत ‘नाच गं घुमा’ने बॉक्स ऑफिसवर जवळपास १६ कोटींहून अधिक गल्ला जमावला आहे. मराठी बॉक्स ऑफिस गाजवल्यावर आता ‘नाच गं घुमा’ थेट परदेशवारीवर जाणार आहे. यासंदर्भातील खास पोस्ट निर्माता स्वप्नील जोशीने शेअर केली आहे.
आता संपूर्ण राज्यभरात कौतुकाची थाप मिळवल्यावर ‘नाच गं घुमा’ अमेरिकेत दाखवला जाणार आहे.‘नाच गं घुमा’च्या टीमने परदेशातील प्रेक्षकांसाठी या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचं आयोजन केलं आहे. अमेरिकेतील ऑस्टिन, डॅलस, SFO bay area, हॉस्टन, सीऐटल, लॉस एंजेल्स या शहरांमध्ये १८ ते १९ मे दरम्यान चित्रपटाचं स्क्रिनिंग करण्यात येईल. याशिवाय जर्मनी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा या देशांमध्ये सुद्धा ‘नाच गं घुमा’ प्रदर्शित करण्यात येणार आहे.
“‘नाच गं घुमा’ चित्रपट थेट जाऊन पोहोचलाय अमेरिकेत!काय मग? आपल्या लाडक्या घुमांचं स्वागत दणक्यात करणार ना?” अशी पोस्ट शेअर करत स्वप्नीलने व्हिडीओमध्ये अमेरिकेतील कोणत्या चित्रपटगृहांमध्ये किती शो होणार याची माहिती दिली आहे. याशिवाय प्रेक्षकांना तिकीटं कुठे बूक करता येतील याबद्दल देखील अभिनेत्याने पोस्टमध्ये माहिती दिली आहे.
‘नाच गं घुमा’ला एकूण ६ निर्माते लाभले आहेत. स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी आणि तृप्ती पाटील यांनी एकत्र मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
SL/ML/SL
17 May 2024