भीमापात्रात सापडलेल्या ७ मृतदेहांचे गूढ उकलले
पुणे,दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे जिल्ह्यात दौंड परिसरात पारगाव येथील भीमा नदीत काल मंगळवारी 7 जणांचा मृतदेह आढळले होते. दौंड तालुक्यातील पारगाव येथील भीमा नदी पात्रात एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या नसून हत्या झाल्याचं कारण उघड झालं आहे.
चार चुलत भावांनीच कुटुंब प्रमुखासह सात जणांची हत्या केल्याचे समोर आले आहे. मृतक मोहन पवार यांचे आरोपी हे सख्खे चुलत भाऊ आहेत. पवार कुटुंबीयांनीच आपल्या मुलाचा अपघात करुन त्याचा खून केल्याचा संशय एका चुलत भावाला होता. त्यातून त्याने इतर तीन भावांसह पवार कुटुंबातील 7 जणांची हत्या केली व नंतर त्यांचे मृतदेह भीमा नदीत फेकल्याचे तपासात समोर आले आहे.
आत्तापर्यंत झालेल्या तपासामध्ये आरोपी अशोक कल्याण पवार याचा मुलगा धनंजय याचा काही महिन्यांपूर्वी वाघोली येथे अपघाती मृत्यू झाला होता. त्याचच्या मृत्यूसाठी मृतक मोहन उत्तम पवार व त्याचा मुलगा अनिल मोहन पवार हेच जबाबदार आहेत, असा आरोपींना संशय होता. त्याचा राग मनात धरून बदला घेण्यासाठी त्यांनी सदरचा गुन्हा केलेला आहे, असे प्रथमदर्शनी समोर आलेले आहे.
घटनेच्या दिवशी आरोपींनी चुलत भाऊ मोहन पवार व त्याच्या कुटुंबीयांना गावाला जाऊ, असे सांगितले आणि गाडीत बसवले. त्यानंतर ते भीमा नदी पात्राच्या जवळ गेले. तेथे आरोपींनी 7 जणांना मारून त्यांचे मृतदेह भीमा नदी पात्रात फेकून दिले आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी नेमके कशाप्रकारे मयतांना मारले, त्यांच्या खुनामागे नेमके अजून कोणते इतर कारण आहे का?, याबाबत पुणे ग्रामीण पोलिस यांची स्थानिक गुन्हे शाखा तपास करत आहे.
SL/KA/SL
25 Jan. 2023