संविधानविरोधी शक्तींचा पराभव करून महाराष्ट्रात मविआचे सरकार

 संविधानविरोधी शक्तींचा पराभव करून महाराष्ट्रात मविआचे सरकार

नंदूरबार/नांदेड, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संविधानाने सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानाला रिकामे पुस्तक म्हणतात. संविधान रिकामे पुस्तक नाही तर त्यात बिरसा मुंडा, भगवान बुद्ध, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांची विचारसरणी आहे. संविधानात भारताचे ज्ञान, देशाचा आत्मा आहे. नरेंद्र मोदींनी संविधानाला रिकामे पुस्तक म्हणून बिरसा मुंडा, भगवान बुद्ध, गांधीजी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. काँग्रेस, इंडिया आघाडी मात्र कोणत्याही परिस्थितीत संविधानाचे रक्षण करेल आणि संविधानविरोधी शक्तींचा पराभव करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करेल, असा विश्वास लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेस मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नंदूरबार आणि नांदेड मध्ये प्रचारसभा झाल्या. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, राज्यघटनेत ‘आदिवासी’ असे म्हटलेले असताना भाजप-
आरएसएसचे लोक आदिवासींना ‘वनवासी’ म्हणून जल, जंगल आणि जमिनीवरील हक्कापासून वंचित ठेवत आहे.

आदिवासींच्या हक्कासाठी बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला आणि शहीद झाले. आज नरेंद्र मोदी आणि भाजपविरुद्ध लढावे लागत आहे. भूसंपादन विधेयक आणि पेसा कायदा आणून काँग्रेसने आदिवासींची जल, जंगल आणि जमीन संरक्षित केली पण भाजपची सत्ता येताच त्यांनी ‘वनवासी’ म्हणत आदिवासींचे हक्क हिरावून घेत आहे.

भाजपा सरकारवर तोफ डागत राहुल गांधी पुढे म्हणाले की, भाजपा सरकारने महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातसह इतर राज्यात पाठवले, त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना नोकरीसाठी दुसऱ्या राज्यात जावे लागते. वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्पाने १० हजार तरुणांना रोजगार दिला असता, टाटा एअरबस प्रकल्पातून १० हजार तरुणांना रोजगार मिळाला असता, आयफोन प्रकल्पातून ७५ हजार तरुणांना रोजगार मिळाला असता, ड्रग पार्कमुळे ८० हजार तरुणांना रोजगार मिळाला असता, गेल पेट्रोकेमिकल प्रकल्पातून २१ हजार रोजगार मिळाले असते पण भाजपा शिंदे सरकारने सर्व प्रकल्प गुजरातला पाठवून महाराष्ट्रातील ५ लाख नोकऱ्या गमावल्या. यामुळेच तरुण बेरोजगार झाले आहेत.

मविआचे सरकार असे होऊ देणार नाही. जो प्रकल्प गुजरातचा आहे तो त्यांचाच राहील आणि जो महाराष्ट्राचा आहे तो इथून कुठेही जाणार नाही अशी ग्वाही राहुल गांधी यांनी दिली.

मोदी सरकार मुंबईतील धरावीची एक लाख कोटी रुपयांची जमीन अदानींना देत आहे पण आदिवासी, दलित, मागासवर्गीय, शेतकरी, महिलांना काय दिले, असा प्रश्न विचारून मविआ सरकार आल्यानंतर महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला ३ हजार रुपये खटाखट खटाखट जमा होतील, महिलांना मोफत बस प्रवास देणार, शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंतची कर्जमाफी करणार. धान, कापूस, सोयाबीनला हमीभाव देऊ.

सर्वांना २५ लाख रुपयांचा आरोग्य विमा ,मोफत औषधे देणार, बेरोजगार तरुणांना ४ हजार रुपयांना भत्ता, २.५ लाख सरकारी नोकर भरती करणार, जातनिहाय जनगणना तसेच ५० टक्यांची मर्यादा हटवू असे राहुल गांधी यांनी सांगितले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *