मुंबईतील मोकळ्या जागा मित्रांच्या घशात , सरकारी जमिनी अडाणी ना
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईतील बगीचे , मैदाने , मोकळ्या जागा बिल्डर मित्रांच्या घशात घालण्याचा डाव सुरू आहे. ‘जो जमीन सरकारकी है..वो जमीन अदानी की है’… अशा पध्दतीने धारावीपासून विमानतळ, विमानतळ कॉलनी अशी सर्व कंत्राटे आपल्या मित्रांना देण्याचे काम सध्या सुरु आहे अशी जोरदार टीका काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी आज विधानसभेत केली.
मुंबई महानगर प्रदेशातील विषयांवरील चर्चेत भाग घेताना त्यांनी केंद्र सरकारपासून राज्य सरकारचे बाभाडे काढले. सध्या पालिकेवर सरकारची कुरघोडी सुरु आहे. पालिका खरोखर स्वायत्त आहे का असा सवाल त्यांनी केला. दोन पालक मंत्र्यांना पालिका मुख्यालयात आणून बसवले आहे. पालिका आयुक्तांवर सध्या सरकारचा दबाव आहे. निवडणूक आयोगाने पालिका आयुक्तांची बदली करण्याची नोटीस दिली आहे. ईडीची नोटीस आलेल्या पालिका आयुक्तांची पालिकेतील अधिका-यांची बदली करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.
दीडशे कोटीची टेंडर
मुंबईतील डिप क्लिनिंगपासून खड्डे बुजवण्याचे कंत्राट ‘मित्रा’ला दिले जात आहे. विधान परिषदेतील कोणासाठी टेंडर काढले जात आहे का अशी विचारणा त्यांनी यावेळी केली. गेल्या नऊ दिवसात दीडशे कोट रुपयांची टेंडर काढण्यात आली हे सगळे कोणासाठी आहे . पालिकेची सध्या लूट सुरु आहे. मुंबईतल्या विद्युत रोषणाईसाठी सतराशे कोटी रुपये खर्च करण्यात आले. पण चीनचे हे दिवे किती ठिकाणी सुरु आहे असा सवाल यावेळी त्यांनी केले.
धारावीकरांचे हक्क पायदळी
धारावी पुनर्विकासाच्या मुद्यावरून वर्षा गायकवाड यांनी सरकारवर हल्ला केला. धारावीकरांच्या हक्कांना पायदळी तुडवले जात आहे. धारावीकरांना रेल्वेच्या जमीनीवर स्थलांतरित करणार आहेत. पण रेल्वेची जागा धारावीकरांना मालकी हक्काने मिळणार नाही. ही जमीन मालकी हक्काने देण्यास रेल्वेने नकार दिला आहे. रेल्वेच्या जमीनीवरील जागेच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करता येणार नाही. धारावीकरांना धारावीतच घर मिळाले पाहिजे अशी मागणी गायकवाड यांनी यावेळी केली.
ML/KA/PGB 28 Feb 2024