मुंबईतील म्युझिकल मार्ग होणार शांत

 मुंबईतील म्युझिकल मार्ग होणार शांत

मुंबई, दि.26 : मोठा गाजावाजा करून मुंबई कोस्टल रोडवर मोठा खर्च करून अत्याधुनिक परदेशी तंत्र वापरून ‘जय हो’ या गाण्याचा ट्रॅक सुरू करण्यात आला. ताशी 70 किमी वेगाने या रस्त्यावरून वाहन नेल्यास ‘जय हो’ ची धून ऐकू येते मात्र या सतत वाजणाऱ्या गाण्यामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. ब्रीच कँडीच्या रहिवाशांकडून या मेलडी रोडला विरोध केला जात आहे. सतत वाजणाऱ्या गाण्यामुळे त्रास होत असल्याचं या रहिवाशांचं म्हणणं आहे. ब्रीच कँडी परिसरातील रहिवाशांकडून सतत होणाऱ्या आवाजाबाबत तक्रारी आल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने हा रस्ता तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रिच कँडी परिसरातील सुमारे ६५० हून अधिक कुटुंबांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करत या प्रकल्पामुळे शांतता भंग होत असल्याचे नमूद केले. “खिडक्या उघडून ठेवणेही कठीण झाले आहे. सततचा आवाज त्रासदायक ठरत आहे,” असे रहिवाशांनी म्हटले आहे.

महापालिका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्राथमिक ध्वनीपातळी मोजमाप नियमांनुसार मर्यादेत असले तरी मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने हा रस्ता सध्या बंद करण्यात आला आहे. भविष्यात हा ‘मेलोडी रोड’ केवळ विशेष प्रसंगी किंवा विकेंडला सुरू ठेवण्याचा विचार केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने तज्ञांकडून अधिक सविस्तर ध्वनी अभ्यास करण्याचे निर्देश दिले असून, विशेषतः रात्रीच्या वेळी होणाऱ्या आवाजाचा परिणाम तपासला जाणार आहे. त्यानुसार आवश्यक बदल करण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *