२७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मुंबईने जिंकला इराणी कप
मुंबई दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाने लखनौच्या इकाना स्टेडियमवर शेष भारताचा पराभव करून प्रतिष्ठेच्या इराणी चषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. तब्बल २७ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मुंबई संघाला हे यश मिळालं आहे. इराणी चषक जिंकण्याची मुंबईची ही १५ वी वेळ आहे. सर्वाधिक इराणी कप जिंकण्याचा विक्रमही मुंबई संघाच्या नावावर आहे. यापूर्वी १९९७-९८ साली संघानं ही स्पर्धा जिंकली होती.
रहाणेच्या संघानं पहिल्या दिवसापासूनच आपलं वर्चस्व कायम राखत पहिल्या डावात ५३७ धावांची मजल मारली. सरफराज खाननं नाबाद २२२ धावांची खेळी करत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याचं चौथं द्विशतक झळकावलं. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीला कर्णधार रहाणेनं चांगली साथ दिली. रहाणेनं ९७ धावांची खेळी केली. शेष भारत संघाच्या गोलंदाजीचा चिवटपणे सामना करणाऱ्या रहाणेचं शतक अवघ्या तीन धावांसाठी हुकलं.
प्रत्युत्तरादाखल पहिल्या डावात शेष भारतानं चांगली लढत दिली. अभिमन्यू ईश्वरननं १९१ धावांची शानदार खेळी करत आघाडी घेतली. मात्र, मुंबईच्या गोलंदाजांनी वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाजांनी टिच्चून मारा करत शेष भारत संघाला ४१६ धावांवर रोखण्यात यश मिळवलं. त्यामुळं मुंबईला पहिल्या डावात १२१ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. तीच मुंबईच्या विजयात निर्णायक ठरली.
SL/ML/SL
5 Oct. 2024