‘क्लायमेट स्कील प्रोग्राम’साठी ब्रिटिश कौन्सिलकडून मुंबई विद्यापीठाची निवड

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिकत असलेल्या युवकांमध्ये हवामान बदलाविषयी व्यापक जनजागृती करून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यात कौशल्य विकसीत करण्यासाठी ब्रिटिश कौन्सिलकडून ‘क्लायमेट स्कील प्रोग्राम’साठी मुंबई विद्यापीठाची निवड करण्यात आली आहे. ब्रिटिश कौन्सिल आणि एचएसबीसी यांच्या अर्थ सहाय्याने मुंबई विद्यापीठात क्लायमेट स्कील प्रोग्राम राबविला जाणार आहे.
ब्रिटिश कौन्सिलच्या माध्यमातून ब्राझील, मेक्सिको, इंडोनेशिया, व्हियतनाम आणि भारतात हा उपक्रम राबवला जात आहे. पर्यावरणपूरक जीवनशैली आत्मसात करणे आणि निरंतर विकासाचे उद्दिष्ट्य साधण्यासाठी ब्रिटिश कौन्सिलने देशभरातील उच्च शिक्षण संस्थांकडून प्रस्ताव मागविले होते. पूर्ण देशभरातून तीन उच्च शिक्षण संस्थाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई विद्यापीठाची निवड झाली आहे. विद्यापीठामधे स्थापन झालेल्या कार्बन न्यूट्रल ग्रीन कॅम्पस उपक्रमांतर्गत जैवविविधता प्रकल्प, पाणथळ भूमी संवर्धन, हरित कॅम्पस, रेन वॉटर हार्वेस्टिंग, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प असे विविध पर्यावरण पुरक राबविले जात आहेत. या प्रकल्पावर काम करण्यास मुंबई विद्यापीठाचा प्रस्ताव मान्य करण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत उच्च शिक्षण संस्थामध्ये शिकत असलेल्या तरुणांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या क्लायमेट स्कील प्रोग्राम अंतर्गत युवकांमध्ये हवामान बदलांबाबत जागृकता, हवामान बदलांचे परिणाम आणि त्याची दाहकता कशी कमी करता येईल यावर भर दिला जाणार आहे.
एकूण २२५ ट्रेनर्स आणि १२०० विद्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या सात जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांतून निवडले जातील. स्थानिक स्वराज्य संस्था, विविध बिगरशासकीय संस्था, निमशासकीय आणि सेवाभावी संस्था यांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे.
SL/ML/SL
19 March