मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प जवळपास झाला पूर्ण

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई शहरांना जोडून मुंबई महानगर प्रदेशाच्या भविष्यातील प्रगतीचा द्योतक ठरणाऱ्या सुमारे २२ किमी लांबीच्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या वाटचाल पूर्णत्वाकडे होत असून त्याचे ९६ टक्के काम पूर्ण झाले आहे. या कामाच्या प्रगतीची पाहणी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, यांनी केली.
सद्यस्थितीत प्रकल्पाचे ९६.६० टक्के कामे पूर्ण झाली असून विद्युत खांबाच्या उभारणीचे काम सुरु आहे. या प्रकल्पात एकूण १२१२ विद्युत दिव्यांच्या खांबांची उभारणी केली जाणार असून त्यातील २०% खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. या खांबांवरील विद्युत दिवे हे केंद्रीय नियंत्रण आणि देखरेख प्रणालीव्दारे (Central Control & Monitoring System ) नियंत्रित केले जातील.
हे खांब सागरी क्षेत्रातील हवामानाच्यादृष्टीने निर्माण होणाऱ्या आव्हानावर मात करतील अशा पद्धतीने निर्माण करण्यात आले आहे. विशेषतः खारट वातावरणात त्यांची उपयुक्तता, गंज-मुक्त पॉलीयुरेथेन लेप, गंज टाळण्यासाठी आणि आयुष्य वाढवण्यासाठी गॅल्वनायझेशन, जोरदार वाऱ्याच्या वेगाशी सामना करण्यासारख्या आव्हानांना तोंड देणारी संरचनात्मक रचना आणि संपूर्ण पुलावर एकसमान प्रदीपन यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, या खांबांना वीज अवरोधक यंत्रणा बसवण्याची सोय करण्यात आली आहे.
बांधकामासाठी नाविन्यपूर्ण दृष्टीकोन
एमटीएचल प्रकल्पाची व्याप्ती पाहता, हा प्रकल्प एकूण ४ पॅकेज मध्ये विभागला गेला आहे. ज्यामध्ये ३ पॅकेज हे स्थापत्य कामांकरीता असून ४ था पॅकेज हा इंटेलिजेंट ट्रान्सपोर्ट सिस्टम (intelligent transport system), स्वयंचलित टोल कलेक्शन यंत्रणा आणि विद्युत कामांकरीता असल्याने तो इतर पॅकज प्रमाणेच विशेष महत्त्वाचा आहे.
एमटीएचल हा प्रकल्प सुमारे ६५ ते १८० मीटर लांबीच्या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक (OSD) सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या प्रकल्पाचे बांधकाम करण्यात आले आहे.
मुंबईशहर आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या भगांसोबत जलद जोडणी
एमटीएचल प्रकल्प हा नवी मुंबई सह प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदर, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गासह विविध महत्त्वाच्या ठिकाणी जलद जोडणी प्रदान करण्याची क्षमता राखणारा आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशाच्या सर्वांगीन विकासासाठी आणि समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे.
प्रकल्पातील उल्लेखनीय प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करताना एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भा.प्र.से. म्हणाले, “मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प हा मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासातील एक महत्त्वाचा भाग आहे. हा केवळ कनेक्टिव्हिटी सुधारणार प्रकल्प नसून प्रदेशाच्या सर्वांगीण समृद्धीसाठी देखील महत्त्वपूर्ण आहे. प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी सुरू असलेल्या उल्लेखनीय प्रगतीचा मला आनंद होत आहे आणि हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यात सहभागी सर्वांचे योगदान हे महत्त्वपूर्ण असून ते योग्यरीतीने सुरू आहे.”
एमएमआरडीए एमटीएचएल प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी आणि मुंबई आणि नवी मुंबईच्या वाहतूक नेटवर्कमध्ये त्याचे यशस्वी एकत्रीकरण सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.
ML/KA/PGB 22 Sep 2023