मुंबईतील टँकर चालकांचा संप बैठकीनंतर मागे…

मुंबई दि.14(एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील टँकर चालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत विहिरी, कूपनलिका व खासगी टँकर्स अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आज महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि मुंबई वॉटर टँकर असोसिएशन यांच्यात पार पडलेल्या सकारात्मक चर्चेनंतर टँकर चालकांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली.
या बैठकीला डॉ. (श्रीमती) दक्षा शाह, चेतन चौबळ तसेच टँकर असोसिएशनचे राजेश ठाकूर, हरबंस सिंग, जीतू शाह, अमोल मांढरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेने आपली बाजू मांडत केंद्र शासनाशी संबंधित मागण्या मांडण्यास महापालिकेच्या सहाय्याची विनंती केली. यासंदर्भात सविस्तर निवेदनही आयुक्तांना सादर करण्यात आले.
श्री. गगराणी यांनी आश्वस्त करताना सांगितले की, केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नोटिसांना १५ जून २०२५ पर्यंत स्थगिती देण्यात आली असून, नियम न पाळल्यास दिलेल्या नोटिसाही मागे घेण्यात येतील. तांत्रिक बाबींमध्ये हस्तक्षेप शक्य नसला तरी केंद्र शासनाकडे मागण्या पोहोचवण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सहकार्य करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या चर्चेनंतर टँकर चालक संघटनेने सकारात्मक भूमिका घेत संप मागे घेतल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे आता महानगरपालिकेला खासगी टँकर्स अधिग्रहित करण्याची गरज भासणार नाही.
SW/ML/SL
14 April 2025