मुंबई उपनगर पूर्व, पश्चिम, पुणे ग्रामीण उपांत्य फेरीत
ठाणे, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई उपनगर पश्चिम संघाने पूर्व संघाला पराभवाचा धक्का देत प्रशांत जाधवर फाऊंडेशन आणि विठ्ठल क्रीडा मंडळ आयोजित कुमारांच्या सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले. अन्य लढतीत पुणे ग्रामीणच्या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
कुमार गटात मुंबई उपनगर पश्चिम, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड तसेच नंदुरबार तर कुमारी गटात मुंबई उपनगर पुर्व पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण कोल्हापूर उपांत्य फेरीत दाखल झाले.
ठाणे- येथील दिवंगत आनंद दिघे क्रीडानगरीत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली विठ्ठल क्रीडा मंडळ , प्रशांत जाधवर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ५० वी सुवर्ण महोत्सवी मुख्यमंत्री चषक कुमार – कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेच्या चौथ्या दिवशी रात्री उशीरा झालेल्या सामन्यात कुमार गटात मुंबई उपनगर पश्चिम, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड तसेच नंदुरबार तर कुमारी गटात मुंबई उपनगर पुर्व पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण कोल्हापूर संघांनी उपांत्य पुर्व फेरीत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना धुळ चारत उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत.
कुमार गटात या स्पर्धेत प्रथमच मुंबई उपनगर पश्चिम आणि पूर्व असे दोन संघ खेळले होते. पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या सामन्यात मुंबई उपनगर पश्चिम संघाने उपनगर पूर्व संघावर ३१-२८ अशी मात करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला उपनगर पश्चिम संघ १३-१८ पिछा़डीवर होता. उपनगरच्या रजत सिंग आणि दिनेश यादव यांनी मध्यंतरानंतर जोरदार हल्ला खेळ करीत आपले आक्रमण वाढविले आणि आपली पिछाडी भरून काढली. त्यांना ओम खुडले तसेच अभिजित वधावल यांनी पकडी घेत साथ दिली.
उपनगर पूर्वच्या प्रसाद पानसरे आणि सुबोध शेलार यांनी जोरदार खेळ केला. तर रोशन शेडगे , रुपेश जाधव यांनी पकडी घेतल्या प्रयत्नांची शिकस्त केली मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या या स्पर्धेत पुणे जिल्ह्याचे तीन विभाग होवून पुणे शहर, पुणे ग्रामिण ,पिंपरी चिंचवड हे संघ प्रथमच तीन विभागांचे सहभागी झाले होते. पैकी पुणे ग्रामीण संघाने रायगड संघावर ३७-२९ असा विजय मिळवित उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला पुणे ग्रामीण संघाकडे १८-१५ अशी निसटती आघाडी होती. मात्र पुणे ग्रामीण संघाच्या विकास जाधव, विजय हेगडकर यांनी उत्कृष्ठ खेळ करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्यांना अनुज गावडे याने सुरेख पकडी घेत चांगली साथ दिली. रायगडच्या मंथन मराठे, निरज मिसाळस यांनी चांगला प्रतिकार केला. तर अविष्कार सतमकर यांनी पकडी घेतल्या. तिसऱ्या उपात्य पुर्व फेरीच्या सामन्यात पिंपरी चिंचवड संघाने सांगली संघाचा ४१-२६ असा पराभव केला. मध्यंतराला पिंपरी चिंचवड संघाकडे २५-११ अशी चांगली आघाडी होती. पिंपरी चिंचवडच्या सिध्दार्थ सोनोने , आर्यन राठोड यांनी चौफेर चढाया करीत आक्रमक खेळ केला आणि विजय सोपा केला. त्यांना कृष्णा चव्हाण ,हरिश उधाने यांनी पकडी घेत विजयात मोलाचा वाटा उचलला.
सांगलीच्या अभिजित पवार, संग्राम जाधव यांनी सुरेख चढाया केल्या. उबेध पथरवत, अशपाक आत्तार यांनी चांगल्या पकडी घेतल्या. चौथ्या सामन्यात नंदुरबार संघाने कोल्हापूर वर ३८-२८ अशी मात केली. मध्यांतराला नंदुरबार संघाकडे १९-८ अशी आघाडी होती. नंदुरबारच्या असिम शेख , सुशांत शिंदे यांनी चौफेर चढाया करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तर जयेश महाजन याने याने चांगल्या पकडी घेतल्या. कोल्हापूरच्या साहिल पाटील याने चांगला प्रतिकार केला. तर दिपक पाटील याने पकडी घेतल्या.
कुमारी गटात पहिल्या उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात पिंपरी चिंचवड संघाने सिंधुदुर्ग संघावर ४९-१७ असा दणदणीत विजय मिळवित उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला पिंपरी चिंचवड संघाकडे ३२-१० अशी आघाडी होती. पिंपरी चिंचवडच्या आर्या पाटील, प्रतिक्षा लांडगे यांनी जोरदार खेळ केला आणि सहज विजय मिळविला. सिफा वस्ताद, सविता गवई आणि ऋतिका गोरे यांनी चांगल्या पकडी घेतल्या. सिंधुदुर्गच्या रिध्दी हडकर, प्रज्ञा शेट्ये यांनी काहिसा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तर समिक्षा धाऊसकर हिने पकडी घेतल्या.
दुसऱ्या सामन्यात मुंबई उपनगर पूर्व संघाने सांगलीचा ३७-३१ असा पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यांतराला उपनगर पूर्व संघाकडे २१ १२ अशी आघाडी होती. उपनगर पुर्वच्या हरप्रित कौर संधु , रसिका पुजारी यांनी आपल्या नावाला साजेसा खेळ करीत सांगलीला खिळखिळे केल आणि विजय मिळविला. समृध्दी मोहिते , गायत्री देवळेकर यांनी पकडी घेत विजयात वाटा उचलला. सांगलीच्या अनुजा शिंदे, ऋतुजा अंबी यांनी चांगल्या चढाया केल्या तर श्रध्दा माळी, किरण तोडकर यांनी पकडी केल्या.
तिसऱ्या सामन्यात पुणे ग्रामीण संघाने अहमदनगर वर ३४-२७ असा विजय मिळवित उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला पुणे ग्रामीण संघाकडे २२-१६ अशी आघाडी होती. पुणे ग्रामीण संघाच्या
साक्षी रावडे , वैभवी जाधव यांनी सुरेख खेळ करीत विजयात मोलाचा वाटा उचलला. तर किशोरी गोडसे , ऋती मोरे यांनी चांगल्या पकडी घेतल्या. अहमदनगरच्या वैष्णवी काळे , पुजा पडावी यांनी चांगला खेळ केला. तर प्रांजल काळे , जान्हवी कुंभार यांनी पकडी घेतल्या.
चौथ्या सामन्यात कोल्हापूर संघाने मुंबई उपनगर पश्चिम संघावर २८-२० असा विजय मिळविला. मध्यंतराला १२-१२ अशा समान गुणांवर दोन्ही संघ होते. मध्यंतरानंतर मात्र कोल्हापूर संघाने अधिक सावध खेळ करीत आपल्या सांघिक खेळाच्या जोरावर विजय मिळविला. कोल्हापूरच्या अंकिता चेचार , ऋतुजा अवघडी यांनी आक्रमक खेळ केला. तर स्नेहल कोळी हिने पकडी घेतल्या. मुंबई उपनगर पश्चिमच्या स्नेहल चिंदरकर , रिया निंबाळकर यांना कोल्हापूरचा बचाव भेदता आला नाही त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तर नयन झा व जागृती नविंदकर यांनी पकडी घेतल्या.
मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेच्या चौथ्या दिवशी माजी खासदार संजीव नाईक, भाजपाचे ठाणे शहराध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक भरत चव्हाण,नारायण पवार, धनंजय सिंग, ठाणे तहसीलदार युवराज बांगर, कृष्णा पाटील, डॉ अमोल गिते, जयेंद्र कोळी, किरण मणेरा उपस्थित होते, या वेळी संजीव नाईक , भरत चव्हाण, नारायण पवार, युवराज बांगर, राहुल लोंढे ,धनंजय सिंग, कृष्णा भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला.
ML/KA/SL
5 Dec. 2023