महाराष्ट्र दिनी सुरु होणार मुंबई-पुणे मिसिंग लिंक
मुंबई, दि. 6 : मुंबई-पुणेदरम्यान अनेक वर्ष रखडलेले दरीपूल, म्हणजेच मिसिंग लिंकचे काम आता 98 टक्के पूर्ण झाल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, लोणावळ्याजवळील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम 98 टक्के पूर्ण झाले असून अंतिम टप्प्यात प्रवेश केला आहे. “काम वेगाने सुरू आहे आणि 1 मे, महाराष्ट्र दिनी, हा रस्ता सुरू करण्याचे आमचे ठोस उद्दिष्ट आहे. उर्वरित कामावर बारकाईने लक्ष ठेवले जात असून सुरक्षितता आणि वेळापत्रक यांचे काटेकोर पालन केले जात आहे,” असे पाटील यांनी सांगितले.
मिसिंग लिंक प्रकल्पात दोन बोगदे आणि एक दरीपूल असे प्रमुख घटक आहेत. यामध्ये 8.9 किमी आणि 1.9 किमी लांबीचे दोन बोगदे तसेच 650 मीटर लांबीचा केबल-स्टे पूल समाविष्ट आहे. या प्रकल्पात समाविष्ट असलेला 650 मीटर लांबीचा केबल-स्टे पूल भारतातील सर्वात उंच दरीपूल ठरणार आहे.
हा पूल जमिनीपासून सुमारे 180 मीटर उंचीवर उभारला जात असून, MSRDC कडून हाती घेतलेले हे आतापर्यंतचे सर्वात आव्हानात्मक अभियांत्रिकी काम मानले जात आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर एक्स्प्रेसवेवरील सध्याच्या घाट विभागातील तीव्र वळणं आणि उतारांमुळे होणारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल.
SL/ML/SL