नववर्ष स्वागतासाठी मुंबई पोलीस सज्ज

मुंबई दि.28(एम एमसी न्यूज नेटवर्क) : नववर्ष स्वागताच्या उत्साहात बृहन्मुंबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असताना, मुंबई पोलीस दलाने नागरिकांचा जल्लोष सुरक्षित व निर्विघ्नपणे साजरा होण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे.
मुंबई पोलीस आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, ८ अपर पोलीस आयुक्त, २९ पोलीस उप आयुक्त, ५३ सहायक पोलीस आयुक्त, २१८४ पोलीस अधिकारी आणि १२,०४८ पोलीस अंमलदार यांचा व्यापक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासोबतच, एस.आर.पी.एफ., क्युआरटी, बीडीडीएस, आरसीपी प्लाटून आणि होमगार्ड याही पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गर्दीच्या ठिकाणी गस्त व फिक्स पॉईंट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. “ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह” विरोधात विशेष मोहिम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.सोबतच मद्यपान करून वाहन चालवणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, महिलांशी गैरवर्तवणूक, अंमली पदार्थांची विक्री व सेवन, तसेच अनधिकृत मद्य विक्री यांसारख्या बेकायदेशीर कृत्यांवर कठोर पावले उचलली जाणार आहेत.मुंबई पोलीसांनी सर्व नागरिकांना नववर्ष जल्लोषात व सुरक्षित साजरे करण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही अडचणीसाठी नागरिकांनी १०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई पोलीस दलाच्या या तयारीमुळे नववर्षाचे स्वागत आनंददायी आणि सुरक्षित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
SW/ML/SL
28 Dec. 2024