राज्य नाट्य स्पर्धेत यंदा ‘मुंबई मराठी पत्रकार संघा’ची एन्ट्री

मुंबई दि १३:– चोवीस तास बातम्यांच्या विश्वात वावरणार्या पत्रकारांच्या मनात दडलेल्या संवेदनशीलतेला व सृजनशीलतेला रंगभूमीवर आता व्यासपीठ मिळणार आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ पहिल्यांदाच ६४ व्या राज्य नाट्य स्पर्धेत उतरणार आहे. सदस्यांच्या कलागुणांना स्टेज देण्याचा हा अभिनव प्रयत्न पत्रकारांच्या नाट्यप्रेमाचा उत्सव ठरणार आहे. ‘नाट्य शुक्रवार’ या उपक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यकारिणीचाही उत्साह वाढला आहे. संघाचे विश्वस्त देवदास मटाले व त्यांची टीम यासाठी घेत असलेले परिश्रम विशेष कौतुकास्पद असल्याचे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितले.
पत्रकार संघाच्या स्त्री-पुरुष सदस्यांना तसेच त्यांच्या पती-पत्नी व मुलांना या नाट्यस्पर्धेसाठी सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. इच्छुकांनी आपले नाव व वय १६ सप्टेंबर २०२५ पर्यंत कार्यालयीन सचिव मुनाफ पटेल (मो. ९९३०६७७९५५) यांच्याकडे नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सहभागाची इच्छा दर्शविणार्यांना ऑडिशनसाठीचे दोन उतारे १६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजल्यानंतर पाठवले जातील. हे उतारे पाठ करून सहभागी उमेदवारांनी २० सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता पत्रकार संघात ऑडिशन द्यायची आहेत. पत्रकारांच्या मनातील दडलेल्या रंगभूमीप्रेमाला वाट मोकळी करून देण्याचा हा पहिला टप्पा असून या अनोख्या प्रवासात पत्रकारांचा सहभाग प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यवाह शैलेंद्र शिर्के यांनी व्यक्त केला आहे.