मुंबई गुजराती पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी गुजरात समाचारचे कुनेश एन. दवे ; सचिवपदी धीरज राठोड

मुंबई, दि. (प्रतिनिधी) : मुंबई गुजराती पत्रकार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणूक नुकतीच अतिशय यशस्वीरित्या संपन्न झाली. ‘गुजरात समाचार’ चे वरिष्ठ राजकीय पत्रकार कुनेश एन. दवे यांची अध्यक्षपदी, ‘गुजरात समाचार’चे वरिष्ठ पत्रकार धीरज एल. राठोड यांची सचिवपदी निवड झाली. ‘जम्मभूमी’चे संजय शाह यांची उपाध्यक्षपदी, ‘जम्मभूमी’चे जितेश व्होरा यांची कोषाध्यक्षपदी आणि ‘गुजरात समाचार’ चे धर्मेंद्र भट्ट, ‘मुंबई समाचार’ च्या सपना देसाई, ‘गुजराती मिड-डे’ च्या सेजल पटेल आणि ‘जम्मभूमी’ चे उमेश देशपांडे यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली.
संघाच्या सचिवपदासाठीच केवळ निवडणूक झाली, ज्यामध्ये ‘गुजरात समाचार’ चे ज्येष्ठ पत्रकार धीरज एल. राठोड यांची मोठ्या बहुमताने निवड झाली. याशिवाय, नवनियुक्त समितीच्या पहिल्या बैठकीत, ‘गुजराती मिड-डे’ चे निमेश दवे यांची संयुक्त सचिवपदी आणि ‘गुजराती मिड-डे’ चे दिनेश सावलिया, ‘जन्मभूमी’ चे धर्मेश वकील आणि ‘बिझनेस इंडिया’ चे भारत मर्चंट यांची सहयोगी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. डॉ. मयूर पारीख यांची असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त अध्यक्ष कुनेश एन दवे यांनी सांगितले आहे की, येत्या काळात असोसिएशनच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रगतीसाठी तसेच सदस्य पत्रकारांच्या उन्नतीसाठी अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.