अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने दोघांना घेतले ताब्यात

मुंबई दि.९ (एम एमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोघांना ताब्यात घेतलं आहे. मेहुल पारिख आणि रोहित साहू अशी या दोघांची नावं आहेत.मेहुल पारीख हा मॉरिस नोरोन्हाचा पीए आहे. मुंबईच्या पश्चिनम उपनगरात असलेल्या दहिसर पश्चिमेतील आयसी कॉलनीत उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हा नावाच्या स्वयंघोषित नेत्यानं पाच गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.नंतर स्वतः ही गोळी झाडून आत्महत्या केली.
अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नोरोन्हा हे दोघं तब्बल ४० मिनिटं एकत्र फेसबुकवर लाईव्ह गप्पा मारत बसले होते. फेसबुक लाईव्ह जेव्हा संपत आलं, तेव्हा मॉरिस खोलीतून बाहेर गेला, त्यानं पिस्तुल काढलं आणि पुन्हा खोलीत शिरून त्यानं अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार केला. अचानक झालेल्या हल्ल्यातून सावरण्याच्या आत ते जमिनीवर कोसळले. अभिषेक घोसाळकरांना तातडीनं करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर तातडीनं शस्त्रक्रियाही सुरू झाली. पण अतिरक्तस्त्रावानं त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान या गुन्ह्याची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. याप्रकरणी बोरीवलीच्या एमएचबी पोलीस ठाण्यात शुक्रवारी पहाटे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हयाचा तपासासाठी पोलिसांची विविध पथके तैनात करण्यात आली. तपास पथकाने मॉरिस नोरोन्हा यांचे पीए मेहुल पारिख आणि रोहित साहू या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला.
यावेळी मेहुल पारीख तिथेच हजर होता असं सांगितलं जातं. तसा उल्लेख फेसबुक लाईव्हवेळी घोसाळकरांवर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिस नोरोन्हानं केला. पोलिसांनी घटनास्थळावरुन १ पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. रोहित साहू नावाच्या तरुणालादेखील ताब्यात घेतलं आहे. त्याचीही चौकशी केली जात आहे.या दोघांच्या चौकशीतून बरीच माहिती पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.गुन्हयाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
SW/KA/SL
9 Feb. 2024