मुंबई सोबतच राज्यातही बहुमजली आणि अतिसुरक्षित कारागृहे

नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईत बहुमजली आणि अतीसुरक्षित असं नवं कारागृह बांधण्यात येईल, त्यासोबतच राज्यात ही यापुढे बहुमजली आणि आंतरराष्ट्रीय नियमांनुसार बदल करून नवी करागृहे बांधण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.
१८९४ साली तयार करण्यात आलेल्या कारागृह कायद्यात बदल करून केवळ शिक्षा भोगणे नव्हे तर त्यातून सुधारणेला वाव देणाऱ्या व्यवस्था असतील असं ते म्हणाले. आता तुरुंगासोबत सुधारगृह देखील असेल, राज्यात सांगली आटपाडी सारखं खुलं कारागृहे उभारणं, कैद्यांचे वर्गिकरण करून त्यात महिला, तरुण, सराईत गुन्हेगार, तृतीयपंथी अशांना वेगळ्या व्यवस्था देण्यात येतील अशी माहिती देखील फडणवीस यांनी यावेळी दिली.
ब्रिटिशकालीन कायद्यात केवळ कठोर शिक्षा भोगायला लावली जात असे मात्र आता कैद्याने शिक्षा भोगल्यानंतर त्यांना पुन्हा समाजात रुजू करून घेण्याची ही गरज आहे त्यामुळे आता जुन्या कायद्यात बदल करण्यात येत आहे , अधिक डॉक्टर्स देऊन कारागृहातच न्यायालय उभारण्याची व्यवस्था करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील विधेयक मांडताना स्पष्ट केलं, त्यानंतर यासंदर्भातील विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं.
ML/ML/PGB 20 Dec 2024