मुंबई कॉंग्रेसची मंत्रालयावर तीव्र निदर्शने

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
भाजपा कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेस कार्यालयावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मंत्रालयासमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली. भाजपाच्या गुंडगिरीचा निषेध करत, अमीत शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत, जयभीमच्या नाऱ्यांनी मंत्रालय परिसर दणाणून गेला होता.
गुरुवारी भाजपच्या सुमारे 40 कार्यकर्त्यांनी मुंबई कॉंग्रेस कार्यालयावर भीषण हल्ला केला. काठ्या, पेव्हर ब्लॉकने हल्ला करत तोडफोड केली. कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना घेरून विनयभंग करत बेदम मारहाण केली. या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबई कॉंग्रेसच्यावतीने मंत्रालयावर निदर्शनं केली गेली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या अमित शाहांचा धिक्कार… अमित शहा इस्तिफा दो… भाजपची गुंडगिरी बंद करा… बीड-परभणी प्रकरणातील दोषींवर कारवाई करा… सोमनाथ सुर्यवंशीला न्याय मिळायलाच हवा*… असे नारे देत मुंबई कॉंग्रेसचे कार्यकर्ते मंत्रालयाच्या गेटवर धडकले. घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी सुरू केली आहे. मात्र अशा भेकड हल्ल्यांनी कॉंग्रेसचे कार्यकर्ते डगमगणार नाहीत. भाजपच्या हिंसेला संविधानिक मार्गाने ठोस उत्तर देवू. कार्यकर्त्यांनी आता निर्धार केला आहे, असं मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते यांनी सांगितलं. पोलिसांनी या आंदोलकांना जबरदस्तीने ताब्यात घेवून आझाद मैदान पोलीस ठाण्यात आणलं.
मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष व संघटन प्रभारी प्रणिल नायर, कोषाध्यक्ष संदीप शुक्ला, मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष कचरू यादव, महेंद्र मुणगेकर, अशोक सुत्राळे, अजंता यादव, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अखिलेश यादव, प्रद्युम्न यादव, नीती महाडीक, किशोर सिंग, बाळा सरोदे, इव्हन डिसूझा, या पदाधिकाऱ्यांसहित असंख्य कार्यकर्त्यांना निदर्शनं करताना अटक करण्यात आली.
ML/ML/PGB 20 Dec 2024