मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या भुयारी बोगद्याचा पहिला भाग सुरू

मुंबई, दि. १४ : मुंबई–अहमदाबाद उच्चगती रेल्वे प्रकल्पाने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. महाराष्ट्रातील घनसोली ते शिळफाटा दरम्यान २१ किमी लांब असलेल्या बुलेट ट्रेनच्या भुयारी बोगद्याचा पहिला विभाग आता खुला झाला आहे. यामध्ये ठाणे खाडीखालून जाणारा तब्बल ७ किमी लांब भाग समाविष्ट आहे, जो देशातील अभियांत्रिकी कौशल्याचे प्रतीक मानला जातो. बोगद्याचा काही भाग न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीने (NATM) बांधण्यात आला असून उर्वरित भागासाठी आधुनिक टनल बोअरिंग मशीन (TBM) वापरण्यात आले आहे. याच मार्गावर स्थित बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील भुयारी स्टेशन ३२.५ मीटर खोल असणार असून त्याच्या वर ९५ मीटर उंच इमारत उभारण्याची क्षमता असलेली भक्कम संरचना असेल.
या प्रकल्पात भारत आणि जपान यांच्यातील सहकार्याचा विशेष ठसा दिसून येतो. भारतात बुलेट ट्रेनसाठी वापरण्यात येणारी शिनकान्सेन तंत्रज्ञान हे संपूर्ण ५०८ किमी मार्गावर लागू केले जाणार आहे. या मार्गावर धावणाऱ्या नव्या पिढीच्या ई१० शिनकान्सेन ट्रेनचे उद्घाटन भारत आणि जपानमध्ये एकाच वेळी होणार असून, या ट्रेनमध्ये ३२० किमी प्रतितास वेग, उच्च दर्जाची सुरक्षितता, आरामदायक सीट्स आणि ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान असणार आहे. भारतात आधी ई५ ट्रेनची चाचणी २०२६ मध्ये होईल आणि त्यानंतर ई१० ट्रेनचे व्यावसायिक प्रवास सुमारे २०३० मध्ये सुरू होईल.
या प्रकल्पात जपानकडून आर्थिक सहाय्य, तांत्रिक मार्गदर्शन आणि अत्याधुनिक ट्रेन सेट्स पुरवले जात असून, हे भागीदारी भारताच्या पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात क्रांतीकारक बदल घडवणार आहे. आतापर्यंत ३१० किमी व्हायाडक्ट्स आणि १५ नदी पूल पूर्ण झाले असून ४ पूल अंतिम टप्प्यात आहेत. १२ स्थानकांपैकी ५ पूर्ण झालेली आहेत आणि ३ स्थानक अंतिम टप्प्यात आहेत.
या प्रकल्पामुळे केवळ प्रवासाची गुणवत्ता सुधारणार नाही, तर महाराष्ट्र व गुजरातच्या विकासातही गती येणार आहे. बुलेट ट्रेनमुळे व्यवसाय, पर्यटन आणि आर्थिक घडामोडींना चालना मिळणार असून स्थानिक रोजगार निर्मितीसही हातभार लागणार आहे. भारताच्या आधुनिकतेच्या दिशेने हा प्रकल्प एक महत्वाचा पायरी ठरतोय.
SL/ML/SL