मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना शंकर शेठ यांचे नाव द्यावे,आमदार सुनील शिंदे
मुंबई, दि ९
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना शंकर शेठ यांचे नाव द्यावे अशी मागणी आमदार सुनील शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्दाद्वारे सभापती महोदयांना केली.गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मुंबईकर जनता पश्चिम रेल्वे मार्गावरील ‘मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानका’ला ‘नाना जगन्नाथ शंकरशेठ’ यांचे नाव देण्याची मागणी करीत आहेत. नाना शंकरशेठ हे ‘ग्रेट ईस्टर्न रेल्वे’ या भारतातील पहिल्या रेल्वे कंपनीचे पहिले संचालक होते. त्यामुळे त्यांना ‘भारतीय रेल्वेचे पितामह’ असेही म्हटले जाते. ते विश्वासू आणि प्रामाणिक व्यापारी होते. त्यांनी आपल्या संपत्तीतील काही हिस्सा सामाजिक कामासाठी दान केला होता. तसेच त्यांनी त्यांच्या वाड्यामध्ये रेल्वेचे पहिले ऑफिस सुरू केले.त्यांनी सती बंदीच्या कायद्यालाही पाठिंबा दिला होता. तसेच सन १८४८ मध्ये त्यांनी मुलींसाठी शाळा सुरु केली होती. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला ‘नाना जगन्नाथ शंकरशेठ’ यांचे नाव देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने मंजूर केला आहे आणि सद्यस्थितीत तो केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी प्रलंबित आहे. या थोर व्यक्तीच्या समाजकार्याला खऱ्या अर्थाने आदरांजली देण्यासाठी सदरहू प्रस्तावाला केंद्र शासनाकडून तातडीने मंजूरी मिळण्यासाठी राज्य शासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करावेत अशी मागणी आमदार सुनील शिंदे यांनी केली.KK/ML/MS