बंद असलेली मुंबई सिंधुदुर्ग विमानसेवा 18 एप्रिल पासून पुन्हा सुरू ….

सिंधुदुर्ग, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी सिंधुदुर्ग विमानतळावरून 18 एप्रिल पासून मुंबई – सिंधुदुर्ग – मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये थांबलेल्या या विमानसेवेला पुनश्च सुरू करण्यासाठी खासदार नारायण राणे यांनी विशेष प्रयत्न केले होते. नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी याबाबत विशेष योजना अमलात आणण्यात येईल असे आश्वासन खासदार राणे यांना दिले होते .गेल्याच एक एप्रिल पासून सिंधुदुर्ग पुणे विमान वाहतूक सुरू झाली आहे. मात्र गेले काही महिने बंद असलेली मुंबई सिंधुदुर्ग मुंबई ही वाहतूक आता पुन्हा सुरू होत आहे.
सध्या दर शुक्रवारी मुंबई सिंधुदुर्ग मुंबई ही विमान वाहतूक सेवा सुरू राहणार आहे. फ्लाई 91 च्या पुणे सेवा , अलायन्स एयरची मुंबई सेवा याशिवाय इंडिगो एअरची सेवा सुरू करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी येथील विमानतळ पुन्हा कार्यान्वित झाल्यामुळे सिंधुदुर्गवासीयांना तसेच पर्यटकांना याचा विशेष फायदा होणार आहे. एप्रिल मे महिना हा शालेय सुट्ट्यांचा कालावधी असल्यामुळे या कालावधीत पर्यटक मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात. त्यांना या सेवेचा विशेष फायदा होणार आहे.
ML/ML/PGB
6 April 2025