येत्या पाच वर्षांत मुंबईतील स्मशानभूमी होणार प्रदूषणविरहित

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगर पालिकेने पुढील पाच वर्षांत प्रदूषणविरहित स्मशानभूमी साकारण्याचे धोरण ठरवले असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचे उपायुक्त राजेश ताम्हाणे यांनी दिली. मुंबई उच्च न्यायालयाने प्रदूषणाबाबत पालिकेला खडेबोल सुनावले होते. यानंतर पालिका प्रशासनाने प्रदूषणाच्या बाबतीत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईत एकूण २६३ स्मशानभूमी आहेत. त्यातील २२५ पारंपरिक लाकडी स्मशाने आहेत. त्यापैकी १० स्मशानभूमीमध्ये विद्युत दाहिन्या आहेत. तर, १८ स्मशानभूमीत गॅसदाहिन्या आहेत. सोबतच २२५ लाकडी स्मशानांपैकी १४ स्मशानांमध्ये ब्रिकेटस बायोमासचा इंधन म्हणून वापर करण्याच्या विचारात बृहन्मुंबई महानगरपालिका असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. ब्रिकेट्स बायोमासचा वापर केल्याने प्रदूषणात घट होईल, असा पालिकेचा दावा आहे. तसेच, बायोमासमुळे लाकडांची देखील बचत होणार असल्याचे महानगरपालिकेने म्हटले आहे. एका मृतदेहाला जाळण्यासाठी साधारण साडेतीनशे ते चारशे किलो लाकडांची गरज असते. तेच बायोमासचा वापर केल्यास केवळ शंभर ते दीडशे किलो लाकूड एक मृतदेह जाळण्यासाठी लागणार आहे. त्यामुळे २५० ते ३०० किलो लाकडाची बचत होणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
मुंबई क्षेत्रात केवळ लाकूड जाळल्याने बारा टक्के प्रदूषण होत असल्याचे आयआयटी मुंबईने २०१७-१८ साली केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. मुंबईतील बेकऱ्यांमुळे आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या लाकडामुळे प्रदूषणात वाढ होत असल्याचे समोर आले आहे. अंत्यसंस्कारांमुळेही प्रदूषणात वाढ होत आहे.
SL/ML/SL
28 Feb. 2025