मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी नवीन स्थानकांची मंजुरी, पण निधीअभावी कामे रखडण्याची शक्यता

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबई उपनगरीय रेल्वेच्या वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने ३२ नवीन रेल्वे स्थानकांना तत्त्वतः मंजुरी दिली आहे. मात्र, या स्थानकांच्या उभारणीसाठी आवश्यक असलेली आर्थिक तरतूद रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. परिणामी, ही कामे प्रत्यक्षात सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता असून, मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC) मध्य आणि पश्चिम रेल्वेला विशेष निधी द्यावा, अशी जोरदार मागणी मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नितीन देशमुख यांनी केली आहे.
मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी कमी करण्यासाठी नव्या स्थानकांची उभारणी आवश्यक आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या स्थानकांमध्ये खालील स्थानकांचा समावेश आहे:
मध्य रेल्वे: किंग सर्कल (मेन लाईन), कोपरी, खारेगाव, चिकलोली, कासगाव, चामटो, गुरवली, वेल्होळी, सागरसंगम
वसई-कोपर-पनवेल-पेण-रोहा मार्ग: पायेगाव, डूंगे, कलवार, पिंपळास, नवी डोंबिवली, नांदिवली, आगासन, पलावा, निरवली, निघू, पेंढार, टैबोडे, नवीन पनवेल, खारपाडा, वडखळ
पश्चिम रेल्वे: वाघवी, सारतोडी, माकुन्सर, चिंतुपाडा, खराळे रोड, पांचाली, वंजारपाडा, बीएस्इएस् कॉलनी
सध्या कार्यरत असलेल्या स्थानकांवर प्रचंड गर्दी होत आहे. नवीन स्थानके सुरू झाली तर या गर्दीचे विभाजन होईल आणि प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळू शकतील. मात्र, मागील ६० वर्षांत केवळ ७ नवीन स्थानके कार्यान्वित झाली आहेत, यावरून रेल्वे स्थानकांच्या विस्ताराचा वेग किती मंद आहे, हे स्पष्ट होते.
नवीन स्थानकांची मंजुरी मिळालेली असली तरी, प्रत्यक्षात काम सुरू होण्यासाठी विशेष निधीची गरज आहे. रेल्वे अर्थसंकल्पात यासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आलेली नाही, त्यामुळे हे प्रकल्प रखडण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाकडे स्वतःच्या निधीतून ही स्थानके उभारण्याची क्षमता नाही, त्यामुळे मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC) मध्य आणि पश्चिम रेल्वेसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाने स्पष्ट केले आहे की, जर लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही, तर मुंबईतील लोकल सेवा आणखी तणावग्रस्त होईल. प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंजूर केलेली सर्व नवीन स्थानके वेगाने कार्यान्वित करावी, अन्यथा यासाठी प्रवासी संघटनांकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही महासंघाने दिला आहे.
ML/ML/PGB 14 Feb 2025