‘मुळशी पॅटर्न’ फेम रमेश परदेशी मनसेतून भाजपात
पुणे, दि २१ : ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटामधील अभिनेते पिट्या भाई म्हणजेच अभिनेता रमेश परदेशी यांनी राज ठाकरे यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पुण्यात मनसेला मोठा झटका बसला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. रमेश परदेशी यांच्यासोबतच मनसेच्या चित्रपट सेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पुण्यात मनसेच्या संघटनेला खिंडार पडले आहे.
पक्षांतरामागील विचारधारा आणि कारण रमेश परदेशी यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी आपली विचारधारा आणि निर्णयामागील कारण सांगितले.
“मी लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मी 22 वर्षे काम केले. पण माझ्यावर संघाचे जे संस्कार आहेत आणि ‘राष्ट्र प्रथम’ हे जे तत्त्व आहे, त्या विचारांवर ठाम राहण्यासाठी मी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला.”, असे त्यांनी सांगितले.
त्यांनी मनसे किंवा राज ठाकरे यांच्याबद्दल कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले. हा निर्णय केवळ वैयक्तिक संस्कार आणि तत्त्वज्ञानावर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले.
SL/ML/SL